‘एल्गारचा खटला चालविण्याचा अधिकार सत्र न्यायालयास नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 04:07 AM2019-07-19T04:07:44+5:302019-07-19T04:07:51+5:30
सत्र न्यायालयात एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सुरू असून त्या न्यायालयास हा खटला चालविण्याचा अधिकार नसल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.
पुणे : सत्र न्यायालयात एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी सुरू असून त्या न्यायालयास हा खटला चालविण्याचा अधिकार नसल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. हा दावा प्रथम वर्ग न्यायालय तसेच संबधित सत्र न्यायालयात करताना त्यांनी डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज दाखल केला. याबाबत गुरुवारी दोन्ही न्यायालयात सुनावणी झाली.
एल्गार प्रकरणातील आरोपपत्र थेट सत्र न्यायालयात चुकीच्या पद्धतीने दाखल केल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्थेकडून एखाद्या खटल्याचा तपास केल्यास त्याची विशेष न्यायालयात सुनावणी करण्याची तरतूद आहे. तसेच बचाव पक्षाच्या वकिलांनी फॉरेन्सिक लेबॉरेटरीचे अधिकारी रोज उपस्थित राहून क्लोन कॉपीची प्रकिया सुरू ठेवण्यास तयार असल्याचे न्यायालयास सांगितले. यावर बचाव पक्षाला न्यायालयाने लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्यास सांगितले. याबरोबर जिल्हा सरकारी वकिलांना म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे.