- निलेश राऊत
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी आमची नियुक्ती झाली आहे. त्या कामावर हजर झालो नाही तर आमच्या नोकरीवर गदा येईल. त्यामुळे "इलेक्शन ड्यूटी मस्ट बाबा", तुमची कामे नंतर असा पवित्राच महापालिकेतील बहुतांशी अधिकारी व सेवकांनी घेतला आहे. त्यामुळे आधीच जनसेवेत तत्पर असलेल्या महापालिकेतील सेवकांचे मोबाइल फोन इलेक्शन ड्यूटीचे कारण देत नॉट रिचेबल झाले आहेत.
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, अग्निशमन दल आदी अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी आणि विविध खात्यातील १,३८३ जणांना जिल्हा निवडणूक शाखेने इलेक्शन ड्यूटी लावली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही कामे करून महापालिकेतील आपली कामे करणे अपेक्षित आहे. निवडणुका जशजशा जवळ येत आहेत, तशतशा या कर्मचाऱ्यांच्या बैठका, प्रशिक्षण व अन्य निवडणूक कामांचा व्याप वाढू लागला आहे. परिणामी महापालिकेतील बहुतांश काम आता ठप्प झाले आहे.
प्रत्येक विभागात एखाद्या विषयावर टिप्पणी तयार करणे, त्यावर अधिकाऱ्यांच्या सह्या व मंजुरी घेणे आदी कार्यालयीन कामे ही लिपिक वर्गाकडून केली जातात; पण सध्या महापालिकेतील हा लिपिक वर्गच निवडणूक कामासाठी सतत बाहेर आहे. महापालिकेतील वर्ग १ पासून ते वर्ग ४ पर्यंतचे सर्व मिळून सध्या १,३८३ जणांचा सेवक वर्ग निवडणूक कामात व्यस्त आहे. यामध्ये विभाग प्रमुखांसह वर्ग २ मधील उप अभियंता, कार्यकारी अभियंता, प्रशासन अधिकारी, सहाय्यक आयुक्त असे ६२ जण, वर्ग ३ मधील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक असे ६६४ जण आणि वर्ग ४ मधील १३३ शिपाई तसेच समूह संघटिका निवडणूक कामात रूजू आहेत.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून प्रत्येक विभागातील (खात्यातील प्रमुखासह शिपायापर्यंत) नावे व त्यांची पदे याची यादी जिल्हा निवडणूक शाखेला सादर करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज नवनवीन सेवकांच्या निवडणूक कामाकाजावरील नियुक्तीचे आदेश विविध खात्यांना प्राप्त होत आहेत.
पाणी समस्याही नंतर :
महापालिकेची अत्यावश्यक सेवा असलेल्या पाणीपुरवठा विभागाला यंदाच्या निवडणूक कामात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंत्यासह १४० जणांचा सेवक वर्ग निवडणूक कामासाठी घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये पाणी सोडणाऱ्या वॉलमनलाही सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत (किमान मतदान पार पडेपर्यंत) तरी शहरातील पाणी प्रश्न काही तात्काळ सुटतील, असे चिन्ह सध्या तरी नाही. आम्हाला निवडणुकीचे काम हेच प्राधान्य आहे आणि ते करावेच लागणार, असा पवित्रा या खात्यासह सर्वच सेवकांनी घेतला आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य निरीक्षकासह, उपायुक्त, शिपाई अशा १२५ जणांना निवडणूक काम लावले आहे. विशेष म्हणजे पालिकेने घेतलेल्या या खात्याकडील नवीन गाड्या, मोबाईल टॉयलेट हेही निवडणूक शाखेने आपल्या ताब्यात घेतले आहे.
गरोदर, बाळंतीन महिला सेवंकाचीही नावे :
महापालिकेकडून सादर केलेल्या सेवकांच्या नावाची सरसकट निवडणूक कामासाठी नियुक्ती केली आहे. यामध्ये महापालिकेतील काही विभागातील बाळंतपणासाठी सुट्टीवर असलेल्या महिला सेवकांनाही नियुक्ती करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
कर्मचारी ३४, यादीत नावे १०० जणांची :
महापालिकेच्या भूसंपादन विभागात हजेरी पुस्तकावर (कार्यरत असलेले) केवळ ३४ कर्मचारी आहेत. असे असताना या विभागाकडे १०० जण सेवक आहेत, असा अहवाल किंबहुना त्यांची नावे महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने जिल्हा प्रशासनाला पाठविली आहे. त्यामुळे उर्वरित ६६ कर्मचाऱ्यांचा शोध कुठे घ्यायचा, असा प्रश्नच या विभागाला पडला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळा :
महापालिकेच्या सेवकांची प्रत्येक निवडणुकीच्या वेळी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून नियुक्ती केली जाते; पण पाणीपुरवठा, अग्निशमन, घनकचरा, आरोग्य अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या खात्यांमधील सेवकांना यातून वगळले जाते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या कामातून कोणाचीच सुटका झालेली नाही. किमान अत्यावश्यक सेवांमधील खात्यांना व तेथील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळावे, असा पत्र व्यवहार महापालिकेकडून करण्यात आलेला आहे.
- महेश पाटील, उपायुक्त, दक्षता विभाग, पुणे महापालिका.