पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. पहिल्या फेरीसाठी प्रवेश अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी (दि. २२) सुमारे ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली. मात्र, केवळ ६५ हजार विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र झाले. त्यातील ५६ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम ऑनलाईन प्रवेश अर्जात नोंदवले आहेत.
न्यायालयाने अकरावी सीईटी परीक्षा रद्द केली. त्यामुळे इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारेच अकरावीसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तत्काळ अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला. तसेच पहिल्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना १७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ५६ हजार विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. दहावीचा निकाल वाढल्याने यंदा अकरावीचा कटऑफ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या प्रवेश फेरीतून किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवण्याबाबत विद्यार्थी व पालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालतात प्रवेश मिळालेल्यास संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील दोन फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
- मीना शेंडकर, सहायक शिक्षण संचालक, विभागीय उपशिक्षण संचालक कार्यालय, पुणे
-------------------------
शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील ३१० कनिष्ठ महाविद्यालयांमधील १ लाख १० हजार ७५६ जागांपैकी ८१ हजार ८४८ जागांवरील प्रवेश कॅप राऊंडमधून दिले जाणार आहेत. तर उर्वरित प्रवेश इनहाऊस, व्यवस्थापन व अल्पसंख्यांक कोट्यातून दिले जाणार आहेत.
----------------------------