येरवडा मनोरुग्णालयाच्या असंवेदनशील कारभाराबाबत आमदार मुळीक यांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 09:56 PM2018-09-12T21:56:35+5:302018-09-12T22:00:21+5:30
मनोरुग्णालयाच्या आवारातील स्वच्छतेसह रुग्णांच्या काळजी,उपचार व देखभालीसह अनेक गंभीर समस्यांबाबत आमदार मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली.
विमाननगर : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय येथील असंवेदनशील विविध समस्याबाबत आमदार जगदीश मुळीक यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह नुकतीच पाहणी केली .मनोरुग्णालयाच्या आवारातील स्वच्छतेसह रुग्णांच्या काळजी,उपचार व देखभालीसह अनेक गंभीर समस्यांबाबत आमदार मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली. या सर्व समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यावेळी रुग्णालय अधीक्षक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपसंचालक आरोग्य सेवा विभाग संजय देशमुख , आरोग्य मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक बलोनिकर, रुग्णालयाचे अधीक्षक अभिजित फडणीस यांच्यासह पाहणी व चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार जगदीश मुळीक यांनी उपचार करून बरे झालेल्या रुग्णांसाठी "खुले कक्ष" सुरु करण्यासाठी संबंधित विभागाकडून पाठपुरावा करून सुरु करावे तसेच रुग्णालयाची स्वच्छता योग्य पद्धतीने करण्यात येत नाही. अनेक कक्षांमध्ये मध्ये दुर्गंधी होत असल्याने रुग्णांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे विविध आजाराने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. रुग्णांना हव्या असणाऱ्या सुविधा पुरविल्या जात नाही. रुग्णालयाच्या परिसराची स्वच्छता करत नसल्याने मलेरिया , डेंगू यांसारख्या श्वसनाच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गंभीर समस्यांबाबत व रुग्णाच्या उपचाराबाबत रुग्णालय प्रशासन दिरंगाई करत असल्याचे आमदार जगदीश मुळीक यांनी सांगितले.
याप्रसंगी मनोरुग्नालयात कामाबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आमदार मुळीक यांनी यावेळी स्पष्ट केले .
तसेच संपूर्ण रुग्णालयाची स्वच्छता लवकरात लवकर करण्यात यावी. रुग्णांना सर्व सामान्य नागरिकाप्रमाणे वागणूक देऊन त्यांच्या समस्या दूर करण्यात याव्यात अशा सूचना केल्या . या सर्व गंभीर समस्यांसंदर्भात आरोग्य मंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत बैठक आयोजित करणार असल्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक संजय देशमुख यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश बाबर, सागर म्हस्के, राहुल पंडागळे उपस्थित होते.