लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोल्हापूर येथील जिल्हा सहकारी बँकेला थर्मल प्रिंटर पेपरचा २० लाख ८८ हजार रुपयांचा माल पुरवला असतानाही त्याचे पैसे मिळाले असतानाही पुण्यातील कंपनीला मात्र पैसे न देता त्याचा अपहार केला. याप्रकरणी कोल्हापूरमधील शैलेश लाटकर (रा. शाहुपुरी, कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी राजेंद्र पवार (वय ५६, रा. माडीवाले कॉलनी) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राटेक ही कंपनी आहे. शैलेश लाटकर यांनी कोल्हापूरच्या जिल्हा सहकारी बँकेचे थर्मल प्रिंटर व त्यासाठी लागणारे पेपर याचे टेंडर भरले होते. त्याचा माल लाटकर यांनी पवार यांच्या कंपनीकडून खरेदी केला होता. पवार यांनी २० लाख ८८ हजार रुपयांच्या मालाचा फेब्रुवारी २०२० मध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेला पुरवठा केला होता. त्यानंतर बँकेने मायक्रोटेक कॉम्प्युटर यांना त्यांचे पूर्ण पैसे वितरित केले होते. मात्र, लाटकर यांनी त्यापैकी फक्त ६ लाख रुपये पवार यांना दिले व उर्वरित १४ लाख ८८ हजार रुपये न देता अपहार केला. सहायक पोलीस निरीक्षक यश सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.