पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी ही राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या श्रमिकांच्या हाताला काम, रोजगार देणारी नगरी बनली आहे. आतापर्यंत सुमारे चार लाख लोकांना या नगरीने रोजगार दिला असून कुशल असो अथवा अकुशल, कोणाच्याही हाताला काम मिळेल,याची हमी मिळू लागल्याने या शहरात बाहेरून येऊन स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण ७१ टक्क्यांवर गेले आहे. गाव ते महानगरात रूपांतर झालेल्या या शहराचे नागरीकरण प्रचंड वाढले आहे. पिंपरी-चिंचवड औद्यागिक क्षेत्रात वाहन उद्योग, तसेच लहान-मोठे असे मिळून सुमारे ६ हजार उद्योग आहेत. सुमारे अडीच हजार लघुउद्योग आहेत. औद्योगिक तंत्र प्रशिक्षण संस्थेतून विविध ट्रेडचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेले तरुण प्रशिक्षणार्थी म्हणून या औद्योगिक नगरीत येतात. मोठ्या कंपन्यांमध्ये संधी मिळते म्हणून सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, विदर्भ, कोकण आदी भागातून तरुण या शहराकडे धाव घेतात. अकुशल कामगारांच्या हातालाही या नगरीत काम मिळण्याची शाश्वती आहे. त्याचे कारण या भागात बांधकाम व्यवसायालाही तेजी आली आहे. औद्योगिक विकासाबरोबर नागरीकरण वाढू लागल्याने बांधकाम व्यवसाय वाढला आहे. बांधकाम व्यवसायात मजूर, बिगारी आणि हेल्पर अशा लोकांची गरज भासू लागली. अकुशल कामगारांनाही कुशल कामगार बनविण्याची प्रक्रिया या उद्योगनरीत घडून आली. माथाडी मंडळांच्या माध्यमातून तसेच सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून माल चढाई-उतराईचे काम आणि रखवालदारीचे काम अनेकांना मिळाले. औद्योगिक भरभराटीमुळे विकासाला चालना मिळाली. उद्योगधंदे वाढले, तसेच त्यास पूरक व्यवसायसुद्धा वाढले. हॉटेल व्यवसायाची भरभराट झाली. शॉपिंग मॉल साकारले. मोठी शैक्षणिक संकुले, बँका, वित्तसंस्थांचे जाळे उभारले. त्यामुळे रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध होत गेल्या. कष्ट करण्याची तयारी असलेल्या व्यक्तीच्या हाताला काम देणाऱ्या या शहराने नावलौकिक मिळवला आहे. लघुउद्योजक घडवले४पोटाचे खळगे भरण्यासाठी या शहरात दाखल झालेल्यांपैकी अनेकांनी कोणताही औद्योगिक वारसा नसताना छोटे उद्योग उभे केले. यशस्वीपणे सुरू ठेवले आहेत. अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्यांनी योगदान दिले आहे. मोठ्या कंपन्यांना पूरक उत्पादन देणारी वर्कशॉप सुरू करून हजारो लघुउद्योजक तयार झाले आहेत.
चार लाख जणांना दिला रोजगार
By admin | Published: December 28, 2014 12:07 AM