पुणे-सोलापूर महामार्गावर अतिक्रमण कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:14 AM2021-08-13T04:14:20+5:302021-08-13T04:14:20+5:30
पुणे-सोलापूर महामार्गाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. अगदी मुख्य हायवे वर सुद्धा भाजी, तसेच फळविक्रेत्यांनी अतिक्रमण ...
पुणे-सोलापूर महामार्गाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. अगदी मुख्य हायवे वर सुद्धा भाजी, तसेच फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता असून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हायवे प्रशासनाने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या माध्यमातून या अतिक्रमणावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महामार्ग प्रशासनाचे कायदेशीर सल्लागार ॲड. सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरुवात करण्यात आली असून या कारवाईला अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांनी विरोध केला.
महामार्गाच्या दोनही बाजूला अतिक्रमण असताना फक्त आमच्याच दुकानावर बुलडोझर का? अशी विचारणा दुकानादारांनी केली. तर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे काही दिवसांची सवलत दिल्यास आम्ही आमची सोय करू, अशी विनंती दुकानदारांनी केली. आधीच कोरोनामुळे आम्ही अर्धमेले झालो, त्यात या कारवाईने दुकानदाराला आणखी मारू नका, अशी आर्जव त्यांनी केली. याबाबत मार्ग काढण्यासाठी अतिक्रमणधारक व्यावसायिक आणि कारवाईसाठी आलेले अधिकारी यांना भिगवण पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. अतिक्रमण करणाऱ्यांनी पोलीस अधिकारी जीवन माने यांना कारवाई काही दिवसासाठी पुढे ढकलण्याची विनंती करणारे पत्र दिले. मात्र, महामार्ग प्रशासन कारवाई करण्यावर ठाम असल्यामुळे वातावरण तापले असल्याचे दिसून आले.
पुणे-सोलापूर महामार्गावरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिक्रमण करण्याची मानसिकता निर्माण होत असून नंतर करण्यात येत असलेल्या कारवाईला विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.