अभियंत्यांनी सामाजिक बांधणीतही सहभागी व्हावे : नंदकुमार वडनेरे; पुण्यात सेवावृतींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 02:57 PM2018-01-29T14:57:23+5:302018-01-29T14:59:39+5:30
सेवानिवृत्त झाल्यावर अभियंत्यांनी पायाभूत सुविधांप्रमाणे सामाजिक बांधणीतही योगदान द्यायला हवे’, असे प्रतिपादन राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांनी केले.
पुणे : ‘पायाभूत सुविधांच्या बांधणीत अभियंत्याचे योगदान मोलाचे असते. अभियंते देशाच्या विकासात भरीव योगदान देत असतात. सेवानिवृत्त झाल्यावर अभियंत्यांनी पायाभूत सुविधांप्रमाणे सामाजिक बांधणीतही योगदान द्यायला हवे’, असे प्रतिपादन राज्याच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांनी केले.
असोसिएशन आॅफ कर्नाटक इंजिनीअर्स रिटायर्ड फ्रॉम महाराष्ट्र सर्व्हिस (कर्नाटक निवृत्त अभियंता संघ) संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार सभारंभात नंदकुमार वडनेरे बोलत होते. विविध क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणाऱ्या ११ सेवावृत्तीचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभियंता संघाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष डी. एन. कुलकर्णी, उपाध्यक्ष एस. डी. मन्नीकर, एम. एस. पाणदरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
जनसेवा फाउंडेशनचे डॉ. विनोद शहा, विकासकर्मी अभियंता मित्र मासिकाचे कमलकांत वडेलकर, भगिनी निवेदिता बँकेच्या मीनाक्षी दाढे, कावेरी महाविद्यालयाचे कुशाल हेगडे, स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी, कन्नड संघाच्या रमा हरिहर, अनुवादिका डॉ. उमा कुलकर्णी, जगन्नाथ दाबोले, अरुणा कुलकर्णी, विजय जकातदार आणि अलकनंदा भानू या ११ सेवावृतींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
वडनेरे म्हणाले, ‘अभियंता म्हणून काम करताना आपण अनेक चांगल्या गोष्टींची निर्मिती करीत असतो. निवृत्तीनंतर कुटुंबाला वेळ देतानाच सामाजिक कार्यातही सहभाग घ्यावा. आज समाजातील संवाद हरपल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संस्कारांच्या कमतरतेमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सामाजिक बांधणी करण्यासाठी अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा.’
पी. एस. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. परिमला हुल्याळकर यांनी सूत्रसंचालन केले. एम. एस. पाणदरे यांनी आभार मानले.