ज्ञानेश्वर भोंडे
पुणे: तुमच्या नाकाचे हाड सरळ करायचे आहे, गालावरची खळी खुलवायचीय, हात, पाय, चेहरा भाजल्याने किंवा आणखी काही कारणाने विद्रूप झालाय, स्त्रियांच्या स्तनांचा आकार फार छाेटा किंवा फारच माेठा आहे ताे कमी किंवा जास्त करायचाय, तर हे सर्व साैंदर्याेपचार करण्यासाठी तुम्हाला खासगी हाॅस्पिटलमध्ये लाखाे रुपये माेजण्याची गरज नाही. हे विविध प्रकारचे साैंदर्याेपचार व शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात अन् तेही माेफत हाेत आहेत.
‘ससून’ म्हटले की, येथे फक्त गंभीर आजारी पडले किंवा शस्त्रक्रिया करायची असेल तेव्हाच या रुग्णालयात जायचे; परंतु शारीरिक उपचारांबराेबरच ससूनमध्ये आता तुमचे साैंदर्य खुलवण्यासाठीदेखील उपचार घेता येणार आहेत. हे अनेकांना माहीतच नाही. ससूनमध्ये ‘प्लास्टिक सर्जरी’ हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. येथे वर्षाला हजार ते बाराशे साैंदर्याेपचार व शस्त्रक्रिया अगदी माेफत किंवा फारफार तर नाममात्र चारशे ते पाचशे रुपयांत हाेतात.
स्त्री असाे की पुरुष प्रत्येकाला आपले साैंदर्य अधिक खुलून दिसावे असे मनाेमन वाटत असते. सध्याच्या स्मार्टफाेन, साेशल मीडियाच्या आणि प्रेझेंटेबल राहण्याच्या युगात तर साैंदर्य राखणे ही एक गरजच बनली आहे. त्यामुळे, काही जण विशेषकरून तरुणी या काॅस्मेटिक्स साैंदर्यप्रसाधने, औषधाेपचार घेतात; परंतु काही गाेष्टींना साैंदर्याेपचार घेणे गरजेचे असते, याचा खर्च खासगी रुग्णालयांत दाेन ते तीन लाखांच्या घरात जातो. हेच उपचार ससूनमध्ये अगदी माेफत हाेतात, हे विशेष.
हे हाेतात साैंदर्याेपचार
- गालावर खळी तयार करणे, चेहऱ्यावरील डाग, मस, तीळ काढणे.- ओठांचे साैंदर्य वाढविणे, बालकांची फाटलेली टाळू किंवा ओठ पूर्ववत करणे.- नाक सरळ करणे, साैंदर्य खुलविणे (हायनाेप्लास्टी), शरीरावरील वाढलेले अतिरिक्त मांस, चरबी कमी करणे (लिपाेसक्शन).- तरुणींच्या स्तनांचा आकार वाढविणे किंवा कमी करणे, पुरुषांचे स्तन वाढले असल्यास आकार कमी करणे (मेल ब्रेस्ट).- प्रसुतीनंतर सैल झालेल्या पाेटाची त्वचा व आकार घट्ट करणे (टमीटक).- डाेळ्यांच्या पापण्यांच्या शस्त्रक्रिया, जन्मजात व्यंग, जळीत रुग्ण, अपघातामुळे चेहऱ्याला आलेली विद्रुपता दूर करणे.- कॅन्सरनंतरचे साैंदर्याेपचार आदी.- अपघातात हाताची तुटलेली बाेटे जाेडणे, मायक्राे सर्जरी, भाजलेले व्रण दूर करणे.- चेहऱ्याची हाडे फ्रॅक्चर झाली असतील तर ती व्यवस्थित करणे.- अपघातात हाड उघडे पडल्यास ते झाकणे आदी.
६० ते ७० ओरिजिनल शाेधनिबंध प्रसिद्ध
जन्मजात व्यंग, भाजणे, अपघात व्यंग, मेल ब्रेस्ट, फीमेल ब्रेस्ट सर्जरी, चेहऱ्यावरील डाग, मस काढणे, कॅन्सर रिकन्स्ट्रक्शन, डाेळ्यांचे आदी साैंदर्याेपचार हाेतात. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातून वर्षाला हजार ते बाराशे रुग्ण येतात. २०१४ साली इथे टीचिंग प्राेग्रामदेखील सुरू केला असून, येथे दाेन विद्यार्थी शिकतात. इथे दहा तज्ज्ञांचा विभाग असून, संशाेधनदेखील हाेते. ६० ते ७० ओरिजिनल शाेधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. - डाॅ. पराग सहस्त्रबुद्धे, विभागप्रमुख, ससून प्लास्टिक सर्जरी विभाग
''यावर्षी आतापर्यंत ६५४ साैंदर्याेपचार व साैंदर्य शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात झाल्या आहेत. जन्मजात व्यंग, अपघात, कॅन्सर शस्त्रक्रियानंतर येणारे व्यंग दूर करणे, अपघातापश्चात चेहऱ्याचे व्यंग दूर करणे, जळीतनंतर अधिक शस्त्रक्रिया हाेतात. - डाॅ. निखिल पानसे, सहयाेगी प्राध्यापक, ससून प्लास्टिक सर्जरी विभाग.''