परीक्षा विभागाची सायबर सुरक्षा सक्षम व्हावी; सिनेट सदस्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 02:57 AM2018-10-28T02:57:47+5:302018-10-28T02:58:14+5:30
परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून इंजिनिअरिंगच्या दोघा विद्यार्थ्यांनी बीएस्सीचे पेपर फोडले होते, या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. या पुढील काळात असे प्रकार होऊ नयेत. परीक्षा विभागाची सायबर सुरक्षा भक्कम व्हावी, अशी मागणी अधिसभा (सिनेट) सदस्यांकडून करण्यात आली.
सिनेट सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी पेपर फुटीप्रकरणी स्थगन प्रस्ताव दाखल केला होता. यावेळी संकेतस्थळ हॅक होण्याचा संदर्भ देत अधिसभा सदस्यांनी विद्यापीठाच्या सायबर यंत्रणेच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारले. परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले, पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे. काही जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सर्व्हरचा काही भाग हॅक करता आला. भविष्यात परीक्षेच्या प्रक्रियेत त्रुटी राहू नयेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले, विद्यापीठातील तज्ज्ञांसह बाहेरील तज्ज्ञांच्या मदतीने सायबर सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. त्यात परीक्षा विभागासह विद्यापीठाच्या संकेतस्थळाची सुरक्षाही भक्कम केली जाईल, येत्या तीन-चार महिन्यांत हे काम पूर्ण होईल.
अध्यासन उभारण्याच्या ठरावांची घेतली नोंद
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अध्यासन व ग. दि. माडगूळकर अध्यासन उभारण्याचे ठराव मांडण्यात आले होते. अध्यासन उभारण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे निधीची उपलब्धता झाल्यास नवीन अध्यासनांची निर्मिती करता येऊ शकेल, असे डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले. शशिकांत तिकोटे यांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अध्यासन होण्याबाबत ग. दि. माडगूळकर अध्यासनाबाबत बागेश्री मंठाळकर यांनी ठराव मांडले होते.