उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांना अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:16 AM2021-08-19T04:16:09+5:302021-08-19T04:16:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सुनेचा छळ करण्याबरोबरच पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील आणि विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सुनेचा छळ करण्याबरोबरच पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील आणि विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे, तसेच दोन्ही आयुक्तालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या उद्योजक गायकवाड पिता-पुत्राला बुधवारी पुणे शहर पोलिसांनी कर्नाटकमधील उडपी येथून अटक केली आहे. मोक्का लावल्यानंतर काही तासांच्या आत पोलिसांनी गायकवाड पिता-पुत्राला अटक केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड आणि नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आय.टी.आय. रोड, औंध, पुणे) अशी अटक केलेल्यांची नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश हा दक्षिणेत फिरत असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले होते. तो तिरुपतीलाही गेल्याचे आढळले होते. शेवटी दक्षिणेतच त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
नानासाहेब गायकवाड हे मोठे उद्योजक आहेत, तर गणेश गायकवाड हा एका पक्षाचा पदाधिकारी होता. त्याला राजकीय पक्षाने पक्षातून काढून टाकलं आहे. गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांच्याविरुद्ध सुनेचा छळ केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांनी ज्योतिषी रघुनाथ येमूल याला ही अटक केली होती. त्याच्या भविष्यवाणीवरूनच गायकवाड कुटुंबाने सुनेचा छळ केल्याचे उघड झाले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात देखील गायकवाड पिता-पुत्रावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गायकवाड पिता-पुत्रासह इतरांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केली होती. मोक्कांतर्गत कारवाई केल्यानंतर काही तासांतच गणेश आणि नानासाहेब गायकवाड यांना अटक करण्यात यश आले आहे.
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गायकवाड बाप-लेकास ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना कायदेशीरबाबी पूर्ण करून गुरुवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.