केडगाव : विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वांत आनंददायक क्षण असतो. अनेक अवलिये त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करतात. कोणी हेलिकॉप्टरने मंडपात येतो, कोणी आकाशात विवाह साजरा करतो. अशा अवलियांमध्ये तरुणीही मागे नसतात. बुधवारी (दि. २) अशीच एक अवलिया नववधू केडगाव (ता. दौंड) येथे विवाहस्थळी बुलेटवरून अवतरली आणि उपस्थितांना अचंबित करून गेली. तिथे शिट्ट्या आणि. खतरनाक.. नाद खुळा.. एकच नंबर.. अशा कमेंटने वातावरण ढवळून निघाले.. केडगाव येथील वधू कोमल शहाजी देशमुख हिचा गणेश कदम या वराशी नियोजित विवाह बुधवारी होता. सदर विवाह केडगाव येथील घरापासून ३ किलोमीटर लांब आर्यन लॉन्स कार्यालयात होता. स्वत:च्या लग्नात कोमल हिने बुलेटवरून येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. देशमुख कुटुंबीयांनीही मोठ्या मनाने तिच्या या बुलेट सवारीसाठी परवानगी दिली. मग काय! लाल रंगाची साडी, आकर्षक केशभूषा व डोळ्यांवर गॉगल लावून सकाळी नववधू कोमल आपल्या घरापासून विवाह स्थळापर्यंत स्वत: बुलेट चालवीत दाखल झाली आणि स्वत:चे अवलियापण तिने सर्वांना दाखविले. विशेष म्हणजे, आर्यन लॉन्स कार्यालय हे पुणे-सोलापूर महामार्गावर होते. म्हणून वधूने भरधाव वेगाने वाहणाऱ्या रस्त्यावरही साडी घालून तितक्याच सफाईदारपणे बुलेट चालविली. रस्त्यावरील प्रवासीही तिच्या या साहसाला मनापासून दाद देत होते. वधूबरोबर चारचाकी वाहनांचा लवाजमा होता. विवाहस्थळी दाखल होताच वऱ्हाडींनी वधूचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. वैवाहिक जीवनाची सुरुवातच धाडसाने केल्याबद्दल तिचे कौतुकही होत होते. .................लहानपणापासून कोमलला बुलेटची हौस होती. तिने बुलेट छंद जोपासला. घरात मुलगा-मुलगी भेदभाव केला जात नाही. आज सकाळी तिचे बुलटप्रेम दाखविण्याची इच्छा तिने व्यक्त केली. मी तत्काळ त्याला संमती दिली. मला कोमलचा वडील म्हणून अभिमान वाटतो.-शहाजी देशमुख, वरपिता
‘बुलेट’ वर एन्ट्री.. अन् विवाह मंडपात शिट्ट्या...नादखुळा.. कडक...लई भारी...चा आव्वाज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 6:27 PM
कोणी हेलिकॉप्टरने मंडपात येतो, कोणी आकाशात विवाह साजरा करतो. अशा अवलियांमध्ये तरुणीही मागे नसतात.
ठळक मुद्देवैवाहिक जीवनाची सुरुवातच धाडसाने केल्याबद्दल तिचे कौतुकही