Pune: ससूनमधून पळालेला मार्शल सापडला; मावशीच्या घरी आला होता आश्रयाला
By नितीश गोवंडे | Published: February 17, 2024 03:55 PM2024-02-17T15:55:10+5:302024-02-17T15:56:35+5:30
शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील तो आरोपी आहे...
पुणे : ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला अखेर सायबर पोलिसांनी पकडले. शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील तो आरोपी आहे. शुक्रवारी (दि. १६) रात्री तो मावशीच्या घरी आश्रयाला आला होता. मात्र पोलिसांनी आधीपासूनच मावशीच्या घरी सापळा रचून ठेवला होता. सायबर पोलिसांचे एक पथक मावशीच्या घरात तर दुसरे घराच्या बाहेर पहारा देत होते. तो घरात येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. मार्शल लुईस लिलाकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता मार्शलने तेथून पळ काढला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात मार्शल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर कर्तव्यात हलगर्जी केल्यामुळे सायबर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले होते.
धमकी दिल्याप्रकरणी स्वाती मोहोळ यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार आकुर्डी येथे रहाणार्या मार्शल लिलाकर याला अटक करण्यात आली. त्याने मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने सोशल मीडियावर खाते उघडून धमकी दिली होती. दरम्यान ९ फेब्रुवारी मार्शल याला ताब्यात घेण्यात आल्यावर, १० दहा फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १३ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान ११ फेब्रुवारी रोजी रात्री छातीत दुखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान दोन्ही कर्मचार्यांची नजर चुकवून मार्शलने तेथून धुम ठोकली होती. त्याच्या शोधार्थ गुन्हे शाखा, सायबर पोलीस आणि बंडगार्डन पोलिसांची पथके होती.
तपास सुरू असताना, पळ काढलेला आरोपी मार्शल गेलेला १२ फेब्रुवारी रोजी आकुर्डी परिसरात येऊन गेला. मात्र तो स्वत:च्या घरी न येता मित्राच्या घरी गेला. त्याने मित्राच्या वडिलांकडे पैसे मागितले. मात्र त्यांच्या खिशात फक्त १३० रुपये होते. हे पैसे घेऊन तो निघून गेला. एका ठिकाणी तो सीसीटीव्हीमध्ये दिसत होता. मात्र त्यानंतर तो मुख्य रस्त्याने न जाता गल्ली बोळातून फिरत असल्याने तसेच त्याच्याजवळ मोबाईल नसल्याने माग काढणे अवघड जात होते. दरम्यान तो शुक्रवारी रात्री थकून भागून मावशीच्या घरी आला. त्याच्याकडे पैसे नव्हते तसेच लपण्याचे पर्यायही संपले होते. यामुळे तो अलगदच पोलिसांच्या तावडीत सापडला. पुढील कारवाईसाठी त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.