प्रेम ही भावना कविता, गप्पांच्या माध्यमातून उलगडत, या भावनेचे विविध कंगोरे समजून घेत ‘अ सिप ऑफ लव्ह’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हॅलेंटाइन्स डे साजरा करण्यात आला. सारद मजकूर, गोष्ट क्रिएशन्स आणि मंगल मीडिया पब्लिकेशनच्या वतीने पर्वती येथील भारतमाता अभ्यासिका सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
कवी प्रदीप आवटे, सुप्रसिद्ध चित्रकार संजय साठे, साहित्यिक दीपक पारखी, सुप्रसिद्ध सुलेखनकार प्रभाकर भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ शेंडगे, नितीन करंदीकर, रुपेश तुरे, मंगेश शहाणे, प्रियांका शहाणे, सारद मजकूरच्या कार्यकारी संचालक अमृता देसरडा, गोष्ट क्रिएशन्सच्या कविता दातीर, मंगल मीडिया पब्लिकेशन्सचे संचालक अजित घस्ते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
माझ्या प्रेमात इतरांनी का पडावं, या प्रश्नानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘शंभर शब्दांत मी ९० शब्दांचं हसते, म्हणून माझ्या प्रेमात पडावं’, ‘कविता करतो, एवढंच कारण माझ्या प्रेमात पडण्यासाठी पुरेसं आहे’, ‘मी खूप छान दिसते, म्हणून..’ अशी वेगवेगळी उत्तरं प्रत्येकाच्या बोलण्यातून समोर आली. कवी रवींद्र हुन्नूरे, ऋतुजा फुलकर, प्रा. डॉ. गणेश वाघमोडे भारत सोळंके, सचिन चव्हाण, मोतीराम पौळ, भालचंद्र सुपेकर, देवश्री अंबरीश, प्रा. अमित सोनावणे, बाबर अली सय्यद, सागर ढोरे, सत्यराज यादव, श्रद्धा जगदाळे यांनी आपल्या कविता सादरीकरणातून प्रेम भावना व्यक्त केली.
स्वत:वर, दुस-यांवर आणि जगण्यावर प्रेम करण्याच्या अनुषंगानेही कार्यक्रमात चर्चा रंगली. मटकीला मोड आल्यावर किंवा झाडाला कळी आल्यावर मला आनंद होणं, म्हणजे मी जगण्यावर प्रेम करते असं मला वाटतं, असं माधुरी आवटे यांनी सांगितलं. रात्री बारा वाजता केक कापून आणि संजय साठे यांच्या गाण्यानं कार्यक्रमाचा समारोप झाला. अजित घस्ते यांनी प्रास्ताविक केले. धनंजय झोंबाडे व नरेश गुंड यांनी निवेदन केले.