जिभेचे लाड थांबवावे लागणार; हॉटेलच्या चमचमीत खाण्यावरही 'महागाईचा' बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 11:58 AM2021-12-07T11:58:16+5:302021-12-07T11:59:03+5:30
घरगुती गॅस बरोबरच आता व्यावसायिक गॅसचे दरही सातत्याने वाढत असल्याने नाईलाजाने हॉटेलमधील प्रत्येक पदार्थांचे दर वाढवावे लागत आहे, असे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले
अभिजित कोळपे
पुणे : दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. पेट्रोल बरोबर गॅसचे दरही सातत्याने वाढत आहे. आता व्यावसायिक गॅस पुन्हा १०० रुपयांनी महागला आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस दोन हजारांच्या पुढे गेला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून मागील तीन महिन्यांत ३५० रूपयांनी दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला आहे. घरगुती गॅस बरोबरच आता व्यावसायिक गॅसचे दरही सातत्याने वाढत असल्याने नाईलाजाने हॉटेलमधील प्रत्येक पदार्थांचे दर वाढवावे लागत आहे, असे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.
पुणे शहरात घरगुती गॅसचे दर आता ९०० रूपयांच्या पुढे गेले आहेत. तर व्यावसायिक गॅसचे दरही सातत्याने वाढत आहे. जूनमध्ये १४७३.५०, तर जुलै महिन्यात १५५० रुपये, सप्टेंबर १७१५.७८ रूपये, तर ऑक्टोबरमध्ये १७५०.५० रूपये दर होता. ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर या तीन महिन्यांत ३५० रूपयांनी दरवाढ झाली आहे. हॉटेलमधील जवळपास प्रत्येक पदार्थांचे दर किमान २ रूपयांपासून ते १० रूपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
१३०० चा सिलिंडर दोन हजारांवर पोहचला
साधारणपणे मागील डिसेंबर २०२० दरम्यान व्यावसायिक सिलिंडरचा दर १३०० रूपये दर होता. एका वर्षात जवळपास तब्बल ७०० ते ८०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे १३०० रूपयांवरून थेट दोन हजारांच्या पुढे व्यावसायिक गॅस गेला आहे.
कोरोना अन् महागाई
''मागील तीन महिन्यात सातत्याने व्यावसायिक गॅसचे दर वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे नाईलाजाने पदार्थांच्या दरात वाढ करावी लागत आहे असे हॉटेल व्यावसायिक मंगेश कदम यांनी सांगितले आहे.''
प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन लावला तर हॉटेल इंडस्ट्रीचे प्रचंड नुकसान होणार
''कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे मागील वर्षभरात हॉटेल इंडस्ट्री पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे हॉटेल व्यावसाय प्रचंड आडचणीत आला आहे. आत कुठे हॉटेल व्यावसाय सुरळीतपणे सुरू झाला आहे. मात्र, गॅसची सातत्याने दरवाढ होत आहे. तसेच ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा लॉकडाऊन जर प्रशासनाने लावला तर हॉटेल इंडस्ट्रीचे प्रचंड नुकसान होणार आहे असे हॉटेल व्यावसायिक श्रीधर गलांडे म्हणाले आहेत.''
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर (१९ किलो)
महिना दर
फेब्रुवारी २०२१ १५२६.९८
मार्च २०२१ १६२६.२८
एप्रिल २०२१ १६५४.३८
जुलै २०२१ १६३७.७८
ऑगस्ट २०२१ १६३७.७८
सप्टेंबर २०२१ १७१५.७८
ऑक्टोबर २०२१ १७५०.५०
नोव्हेंबर २०२१ २०००
डिसेंबर २०२१ २१००