सोमेश्वरनगर: कोरोना साथरोगामुळे शाळा बंद आहेत. साखर कारखाना परिसरात ऊसतोड मजुरांच्या मुलांना देखील पालकांच्या मागे यावे लागले. कोरोनाची भीती वाटत होती. शाळा बंद असून देखील काही समाजसेवा संस्थांच्या माध्यमतून या मजुरांची मुले शिक्षण घेत आहे. शाळा बंद असली तरी आपली मुले शिकत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे विष्णू सुळे आणि आजिनाथ सुळे या मुळच्या बीड येथील पालकांनी सांगितले.
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग व टाटा ट्रस्टस मुंबई, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याच्या सहकार्याने ‘आशा प्रकल्प’ काम करत आहे. कोरोना काळात मुल शाळेपासून दुरावली जाऊ नये या करिता प्रकल्पाच्या माध्यमातून लेखन, वाचन उपक्रम तळावर राबवला जात आहे. दरवर्षी विदर्भ- मराठवाडा या भागातून ऊसतोड करण्यासाठी कारखान्याकडे स्थलांतर करत असतात. ऊसतोड करण्यासाठी येताना मुले गावाकडे नातेवाईक, वस्तीगृह अश्या ठिकाणी शाळेच्या सोयीसाठी ठेवत असतात. तर काहीची सोय होत नाही ते सोबत घेऊन येतात. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने बहुतांश ऊसतोड कामगार मुलांना सोबत घेऊन आले आहेत.
शाळा सुरु असताना या ऊसतोड कामगारांच्या मुलांना नजिकच्या शाळेत दाखल करण्याचे काम प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत होते. शाळा बंद असल्याने या मुलांना शाळेत दाखल करणे अशक्य झाले. परंतु ‘आशा प्रकल्पाच्या’ माध्यमातून या मुलांना त्यांच्या कोपीवर जाऊन कार्यकर्ते मुलांना साक्षर करण्यासाठी धडे घेत आहेत. कार्यकर्ते हातातील कोयता बोधट करण्याच्या दृष्टीने ७८ तळावर जाऊन लेखन -वाचन वर्ग घेत आहेत. दरवर्षी सोमेश्वर कारखान्यावर मुले आली की, आशाचे कार्यकर्ते मुलाना शाळेत दाखल करत. आणि तळावर खेळ, गाणी, शैक्षणिक उपक्रम घेत. परंतु यंदा शाळा बंद असल्याने कोप्यावर जाऊन रात्रीच्या वेळी लेखन-वाचन उपक्रम राबत अभ्यास वर्ग घेऊन मुलांना साक्षर करण्यासाठी त्यांचे दूत बनले आहेत.
‘आशा प्रकल्पा’च्या माध्यमातून सोमेश्वर कारखान्यावर आलेल्या ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १ हजार ८५३ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अहमदनगर, औरंगाबाद , बीड, बुलडाणा ,धुळे जळगाव, जालना ,नंदुरबार ,नाशिक ,उस्मानाबाद ,परभणी ,पुणे ,रायगड ,सोलापूर, यवतमाळ या जिल्ह्यातील तर मध्यप्रदेश मधून सुद्धा ऊसतोड कामगार आले आहेत. मुलांचे केलेल्या सर्वेक्षणात ० ते १८ वयाची २२२७ मुले आढळून आली आहेत. यामध्ये ० ते ६ ची ७०५, ६ ते १४ ची १ हजार २५२ तर १५ ते १८ वयाची २७० मुले असल्याची सर्वेक्षणाअंती दिसून आले. ‘आशा प्रकल्पा’ ने गेल्या चार वर्षातील तुलनेत केलेल्या सर्वेक्षणात ६ ते १४ वयाची सर्वाधिक १ हजार २५२ मुले तळावर आढळून आली आहेत.