आरटीई २ वेळा मुदत वाढवूनही ६० टक्केच प्रवेश निश्चित; राज्यात ५८ हजार जागांवर शिक्कामोर्तब
By प्रशांत बिडवे | Published: May 14, 2023 03:59 PM2023-05-14T15:59:44+5:302023-05-14T15:59:57+5:30
लाॅटरीच्या माध्यमातून राज्यात ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली
पुणे : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर माेफत प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू आहे. लाॅटरीच्या माध्यमातून राज्यभरातून ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. दरम्यान, शिक्षण विभागाने प्रवेश निश्चितीसाठी दाेन वेळा मुदतवाढ देउनही १४ मे दुपारी तीन वाजेपर्यंत ५८ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यांत १५ हजार ५०१ पैकी दहा हजार जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत.
आरटीई कायद्यांतर्गत राज्यातील ८ हजार ८२३ खाजगी शाळांमधील १ लाख १ हजार ८४६ रीक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. राज्यभरातून ३ लाख ६४ हजार ४१३ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यातुन दि.५ एप्रिल राेजी लाॅटरीच्या माध्यमातून ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. लाॅटरी लागलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना १३ एप्रिलपासून मेसेज पाठविण्यास सुरूवात झाली तसेच शाळेत प्रवेश घेण्यासाठी सुरूवातीस २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली हाेती. मात्र, विविध तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश घेण्यात पालकांसमाेर अडथळे येत हाेते. त्यामुळे शिक्षण विभागाकडून प्रवेश घेण्याची पहिल्यांदा ८ मे आणि त्यानंतर १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, दाेन वेळा मुदतवाढ देउनही केवळ ९५ हजार लॉटरी लागलेल्यापैकी ५८ हजार ६६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
आरटीई पाेर्टलवर अतिरिक्त भार पडत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पालकांनी काेणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांची लाॅटरी व्दारे निवड झाली आहे, त्यांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणी पाहता पुन्हा एकदा मुदतवाढ द्यावी अशी मागणी पालकांकडून हाेत आहे.
प्रतिक्षा यादीत ८१ हजार विद्यार्थी
निवड झालेल्या यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रतिक्षा यादीतील ८१ हजार १२९ विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठविण्यात येणार आहेत.