जेजुरी : घटस्थापनेपासून शासनाच्या आदेशानुसार नियम व अटी पळून जेजुरीचे खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होत आहे. शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करीत दररोज २० हजार भाविकांना देवदर्शन दिले जाणार असल्याचे मार्तंड देव संस्थांकडून कळवण्यात आले आहे.
उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर जेजुरीचा खंडोबा देवदर्शनासाठी खुले होत आहे. शासनाने या संदर्भात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करीत भाविकांना देव दर्शन देण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार मार्तंड देव संस्थांन चे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांनी विश्वस्त मंडळाची नुकतीच बैठक घेतली होती.
बैठकीत भाविकांना देव दर्शन देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी घटस्थापनेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन रांगेतूनच योग्य ते अंतर ठेवून देवदर्शन घेता येणार आहे. भाविकांना केवळ मुख दर्शनच मिळणार असून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही. त्याच बरोबर दररोजचे कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी केवळ देवाचे सेवक, पुजारी यांच्याकडून करण्यात येणार आहेत. होणारा नवरात्रोत्सव, आणि दसरा उत्सव देवाचे आठवडेकरी पुजारी,नित्य सेवेकरी, मानकरी यांच्या कडून धार्मिक विधी करून घेतले जाणार आहेत.
दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील भाविकांना तसेच गरोदर स्त्रियांना मंदिर प्रवेश नाही
भाविकांसाठी उत्तर महाद्वारातून मंदिरात प्रवेश दिला जाणार असून पश्चिम महाद्वारातून बाहेर जावे लागणार आहे. भाविकांना मास्क आणि सॅनिटायझर ची सक्ती करण्यात आली आहे. मास्क शिवाय कोणाला ही मंदिर प्रवेश दिला जाणार नाही, स्वयंचलित सॅनिटायझर बूथ ची व्यवस्था केलेली आहे. दहा वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील भाविकांना तसेच गरोदर स्त्रियांना मंदिर प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भाविकांनी स्वतः हुन शासकीय आदेशांचे पालन करून देव संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन ही प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांनी केले आहे. तब्बल दीड वर्षांनी बाजारपेठ फुलली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून जेजुरी गडाकडे जाणारी मुख्य महाद्वार पथावरील बाजारपेठ आता पुन्हा फुलली आहे. उद्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार असल्याने व्यापाऱ्यांनी आपली भंडार खोबऱ्याची दुकाने, देवाचे टाक, प्रतीके, फोटो आदींची दुकाने उघडली आहेत. भाविकांना हवे ते उपलब्ध होण्यासाठी व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी लागणाऱ्या वस्तू भरून ठेवल्या आहेत. मंदिर उघडल्याने व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.