पुणे : माजी सैनिकाच्या घरात घुसून कुटुंबाला शिवीगाळ करत तेथून निघून जाण्याची धमकी देत त्या सैनिकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधल्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन पसार होणाऱ्या चौघांना जागीच पकडले आहे. हा प्रकार भरदिवसा कोरेगाव पार्क परिसरात घडला आहे. मोहंमद रजा इमदाद अली बुरानी (वय ३५, रा. शिरीन अपार्टमेंट, कॅम्प), खालीद अशरफ रजा (वय ३०, रा. कोंढवा), राम शाम मिरे (वय २४, रा. वडारवस्ती, येरवडा), आशिष मनोहर धोत्रे (वय २५, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, दोघे जण पळून गेले आहेत.याप्रकरणी हेमलता मोरे (वय ६०, रा़ मुगल गार्डन सोसायटी, कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना शनिवारी दुपारी घडली़याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांचे वडील काशीनाथ चित्ते हे सध्या ८५ वर्षांचे असून ते एअर फोर्समध्ये सुभेदार या पदावरुन निवृत्त झाले आहेत. दरम्यान यातील आरोपी शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोरे यांच्या घरात घुसले. तसेच, आमचे घर आहे. स्वत:चा हक्क दाखविण्याचे कारणावरून मोरे व त्यांचे कुटुंबाला घरातून बाहेर तत्काळ निघून जाण्यासाठी धमकी देऊन शिवीगाळ केली. यानंतर त्यांच्या वडिलांचे मोटारीमधून अपहरण केले. याची माहिती त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. तसेच कोरेगाव पार्क पोलिसांना देण्यात आली.यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, पोलीस निरीक्षक गणेश माने, कर्मचारी दिनेश शिंदे, विनोद साळुखे, संदीप गायकवाड, रावसाहेब आदर्श व पथकाने तत्काळ धाव घेतली. काही अतंरावरच पोलिसांनी घेराव घालून आरोपींची मोटार अडविली. तसेच, त्यांना पकडून माजी सैनिकाची सुटका केली. कोरेगाव पार्क अधिक तपास करीत आहेत़
माजी सैनिकाचे अपहरण करणाऱ्या चौघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 3:40 AM