लोकमत न्यूज नेटवर्क
काऱ्हाटी : काऱ्हाटी (ता. बारामती) पोपट लक्ष्मण चांदगुडे यांनी सेनादलात चाळीस वर्षे सेवा करून शेतीचा स्वीकार केला आहे. त्यांनी जिरायती भागात वेगळा प्रयोग करीत येथील शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श ठेवला आहे. दीड एकर क्षेत्रात कारले लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
पारंपरिक शेतीला बाजूला सारून सुधारित पद्धतीचा अवलंब करत कमी शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन व कमी दिवसात शेतकरऱ्यांच्या पदरात ज्यादा पैसे कसे मिळतील, याच्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये कारल्याची लागवड केली. ६ फूट रुंदीच्या पट्टा पद्धतीत दोन फुटावर लागवड करण्यात आली. ठिबक सिंचनचा वापर व मल्चिंग पेपर वर कारल्याची लागवड केली आहे. पंचावन्न दिवसांतच पहिला तोडा तोडण्या करता आला आहे. आतापर्यंत पाच टन इतके उत्पादन मिळाले आहे. कारल्याला ३२ रुपये किलो, असा भाव मिळत आहे. ३५ ते ४० टन उत्पादन निघण्याची अपेक्षा आहे
शेतकऱ्यांना शेतावर जाऊन चांगला सल्ला दिला तर शेतकरी भरघोस उत्पादन घेऊन आर्थिक टंचाईतून बाहेर पडू शकतो. परंतु अजून देखील शेतकरी अशा शेती पिकाकडे वळत नसल्याने शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागते. पारंपरिक शेतीला बगल देत शेती केल्यास शेतकऱ्याला भरघोस उत्पादनातून लाखो रुपये मिळतील असे या वेळी ‘लोकमत’शी बोलताना नुन्हेमस कंपनीचे सोमनाथ माकर व सुदाम माकर यांनी सांगितले.
.