विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच दर्जेदार संशोधनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी वाव मिळणार आहे. अभ्यासक्रम तयार करण्याबाबत यूजीसीच्या नियमावलीमुळे काही बंधने येत होती. मात्र, स्वायत्तता मिळाल्यामुळे विद्यापीठांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करणे शक्यहोणार आहे. विविध औद्योगिक कंपन्यांना आवश्यक असणारे मन्युष्यबळ त्यातून उपलब्ध करून देता येऊ शकते. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांतील प्राध्यापकांना बोलावणे शक्य होईल.जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत भारतातील विद्यापीठे खूप मागे आहेत. क्रमवारी वाढविण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण संशोधन हाच एक पर्याय आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यार्थी व प्राध्यापकांनी नावीन्यपूर्ण संशोधनाकडे लक्ष द्यावे, यासाठी सिंबायोसिसकडून लक्ष दिलेजाईल. नॅक मूल्यांकनाबरोबरच टाईम्स रँकिंग, एनआयआरएफ रँकिंग, वाढविण्याच्या दृष्टीने सर्व विद्यापीठांनी प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता आहे. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या परदेशी व भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद व्हावा, या उद्देशाने सिंबायोसिसची स्थापना करण्यात आली. प्रथम सिंबायोसिस अंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रात भारतीय व परदेशी विद्यार्थ्यांना एकत्र करून दिवाळी, रंगपंचमी, ईद, रक्षाबंधन असे सण साजर रण्यात आले. आता ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे ब्रीदवाक्य घेऊन सिंबायोसिसचे काम सुरू आहे. जगभरातील सुमारे ८० देशांमधील विद्यार्थी सिंबायोसिसमध्ये शिक्षण घेतात.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राचे अभिमत विद्यापीठात रुपांतर झाले आणि याच विद्यापीठाचा मी कुलपती झालो. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आता जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठाचे स्थान उंचाविण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वच विद्यापीठांनी आपल्याला खऱ्या अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय’ दर्जा मिळावा, यासाठी पुढील काळात प्रयत्न करायला हवेत.सध्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यांच्या हातांना कामाची गरज आहे.त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी नवनवीन प्रयोग राबवून बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.राज्य शासनाने सिंबायोसिसला महाराष्ट्रात पहिले कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यास परवानगी दिली. या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तसेच नामांकित कंपन्यांनी त्यात सहभाग घेतला आहे. तरुणांना रोजगार देणे हे पहिले महत्त्वाचे काम आहे. त्यादृष्टीने शिक्षण संस्थांनी योगदान देण्याची आवश्यकता आहे. त्यातून देशाच्या विकासाला गती मिळेल.
दर्जेदार संशोधनातून वाढेल शैक्षणिक दर्जा - डॉ. शां. ब. मुजुमदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 2:21 AM