पुणे : शहरातील कोयता गँगची चर्चा विधानसभेत झाल्यानंतर पोलिसांनी कोयत्या गँग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्याला पकडले होते. त्यांची रवानगी येरवड्यातील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्राच्या बाल निरीक्षण गृहामध्ये केली होती. त्यातील सात अल्पवयीन मुलांनी भर दिवसा संस्थेच्या सरंक्षण भितीला शिडी लावून त्यावरुन पलायन केले आहे. त्यांच्याबरोबर सौरभ शिवाजी वायदंडे (वय १८, रा. भेकराईनगर, हडपसर) हाही पळून गेला आहे.
याप्रकरणी काळजीवाहक संतोष किसन कुंभार यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणे बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला.
पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रातील बाल निरीक्षणगृहामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांत पकडलेल्या विधी संघर्षीत मुलांना ठेवले जाते. बाल न्यायालय मंडळाच्या आदेशानुसार सौरभ वायदंडे यालाही निरीक्षणगृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. या मुलांना वेगवेगळ्या सत्रांकरीता बाहेर काढले जाते. त्यावेळी या १६ -१७ वर्षाच्या ७ मुलांनी तेथील शिडी घेऊन ती भिंतीला लावली. त्यावरुन चढून जाऊन ते पळून गेले आहे. पोलीस उपनिरीक्षक काटे अधिक तपास करीत आहेत.