कोथरूडमध्ये विदेशी वृक्ष ‘चले जाव’
By admin | Published: June 14, 2014 12:12 AM2014-06-14T00:12:26+5:302014-06-14T00:12:26+5:30
देशी झाडांच्या वाढीला अडथळा ठरणारे विदेशी वृक्ष नष्ट करण्याची मोहीमच वन विभागाने उघडली आहे
माऊली म्हेत्रे, कोथरूड
पुण्यातील डोंगरटेकड्यांवर दृष्ट लागण्यासारखी वनराई आजही शाबूत आहे; पण काही वर्षांपूर्वी केवळ प्रयोग म्हणून किंबहुना अस्तित्व जोपासण्यासाठी म्हणून लागवड करण्यात आलेली विदेशी झाडे देशी झाडांच्या मुळावर उठली आहेत. त्यामुळे देशी झाडांच्या वाढीला अडथळा ठरणारे विदेशी वृक्ष नष्ट करण्याची मोहीमच वन विभागाने उघडली आहे. कोथरूड भागातील निर्जन डोंगरमाथ्यावरील विदेशी वृक्ष तोडून निंब, आवळा वड, पिंंपळ या देशी वृक्षांची लागवड करून वृक्षांची स्वदेशी चळवळ राबविण्यात येत आहे.
ग्रिलिसिडिया ही विदेशी झाडे पुणे परिसरातील डोंगरमाथ्यावर फोफावली आहेत. काही ठिकाणी तर या झाडांची बनेच तयार झाली आहेत; पण अतिशय कठीण मुळे असणारी आणि जागा व्यापाणारी ही झाडे आजूबाजूला इतर झाडे वाढू देत नाहीत. शिवाय, पर्यावरणदृष्ट्या ही झाडे फायदेशीर नाहीत; उलट फायदेशीर अशा देशी झाडांचे अस्तित्वच ही झाडे नष्ट करतात. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास ही झाडे कारणीभूत ठरत असल्याची भीती पर्यावरणवाद्यांकडून अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे.
या कारणामुळेच केंद्र शासनाची परवानगी घेऊन विदेशी जातीची झाडे नष्ट करण्यात येत असल्याची माहिती वन अधिकारी जीत सिंंग यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘डोंगरटेकड्यांवरील खडकाळ भागावर ग्रिलिसिडियाची लागवड करण्यात येते. या भागातील जमीन देशी वृक्षांची लागवड करण्यास योग्य झाल्यानंतर केद्र शासनाच्या आदेशानुसार विदेशी झाडांची ठराविक प्रमाणात तोडणी करून देशी झाडे लावली जातात. सध्या पुणे वन विभागाला १,००० विदेशी झाडांच्या ऐवजी देशी झाडे लावण्याची परवानगी देण्यात आली असून, वन विभागाच्या वतीने विदेशी झाडे तोडून देशी झाडांची लागवड करण्यात येत आहे.’’
वन विभागाच्या या धोरणात्मक निर्णयानुसार कोथरूडचा म्हातोबानगरचा डोंगरमाथा हा सर्वांत हिरवळीचा भाग तयार झाला आहे. आत्ता या भागात नव्यानेच ३ ते ४ वर्षे आयुष्य असलेली देशी झाडे लावण्यात येणार आहेत.
कोथरूड भागातील स्थानिक लोकांकडून या डोंगराचा वापर केला जात असून, वृक्षतोडीमुळे अनेक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, ही वृक्षतोड नसून वृक्ष संवर्धनाचीच मोहीम असल्याचे समजल्यावर समाधानही व्यक्त करण्यात येत आहे.