पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात घट करण्यात आली. मात्र, प्रवेश शुल्क कमी करूनही विद्यार्थीसंख्येत वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये केवळ १५ हजार ८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजारांपेक्षा कमी आहे.नोकरी करून शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असणाºयांना तरूण-तरूणी, गृहिणींना तसेच आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे महाविद्यालयात नियमित प्रवेश न घेऊ शकणाºया विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात बहि:स्थ अभ्यासक्रम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट घातला होता. मात्र, सर्वच स्तरांतून त्यास विरोध झाल्याने विद्यापीठ प्रशासनाला माघार घ्यावी लागली. परंतु, विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या शुल्कात अवास्तव वाढ केली. परिणामी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, विद्यापीठ अधिसभेतील सदस्यांकडून बहि:स्थ अभ्यासक्रमाचे शुल्क कमी करावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने दोन वेळा बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या शुल्कात घट केली. त्यामुळे विद्यार्थीसंख्येत वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. बहि:स्थ अभ्यासक्रमाचे शुल्क सुमारे सहा ते सात हजार रुपये होते. परंतु, विद्यापीठाने २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांपर्यंत शुल्क कमी करूनही यंदा बहि:स्थ अभ्यास प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या केवळ १५ हजार विद्यार्थ्यांनीच बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रथम वर्षास नव्याने प्रवेश घेतला आहे.नोकरी करून शिक्षण घेणाºया तरुण-तरुणींना तसेच गृहिणींना नियमितपणे महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे शक्य होत नाही. परिणामी हजारो विद्यार्थी बहि:स्थ पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन कला व वाणिज्य शाखेची पदवी व पदव्युत्तर पदवी घेतात. परिणामी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. तर काहींना सध्या करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळते. विद्यापीठांकडून बहि:स्थ अभ्यासक्रम बंद केला जाणार होता; त्या वेळी सर्वच स्तरांतून विरोध झाला. परंतु, विद्यार्थ्यांनीच या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना कमी खर्चात पदवी व पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.- शिवाजी आहिरे, उपकुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
बहि:स्थचे शुल्क कमी होऊनही प्रवेश होईनात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 2:20 AM