पुण्यातल्या कार्ले, भाजे, बेडसे, घोरावडेश्वर, पाले, पाटण या लेण्या आवर्जून पाहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:33 AM2018-06-18T01:33:39+5:302018-06-18T01:33:39+5:30
मावळात खोदण्यात आलेल्या लेण्यांचा विचार करता आपणास कार्ले, भाजे, बेडसे, घोरावडेश्वर, पाले, पाटण या लेण्या प्रामुख्याने दिसतात. ख्रिस्त पूर्व दुसरे शतक ते ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकापर्यंत हिनयानपंथीय लेणी खोदण्यात आली़
कामशेत : मावळात खोदण्यात आलेल्या लेण्यांचा विचार करता आपणास कार्ले, भाजे, बेडसे, घोरावडेश्वर, पाले, पाटण या लेण्या प्रामुख्याने दिसतात. ख्रिस्त पूर्व दुसरे शतक ते ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकापर्यंत हिनयानपंथीय लेणी खोदण्यात आली़ कार्ले, भाजे, बेडसे या लेण्यांमध्ये बुद्ध मूर्ती नाहीत. चौथ्या शतकापासून ते सातव्या शतकाच्या मध्यापर्यंत महायान पंथीय लेणी खोदण्यात आली. सातव्या शतकाच्या उत्तरार्धापासून प्रामुख्याने लेणी आढळतात.
>भाजेगावच्या अप्रतिम लेण्या
कामशेत : लोहगड, विसापूर किल्ल्यांच्या पायथ्याला वसलेले छोटेसे गाव भाजे. मळवली रेल्वे स्थानकापासून २ ते ३ किमी अंतरावरील या निसर्गरम्य गावाच्या शेजारील डोंगराच्या कातळाच्या कुशीत कोरलेल्या अप्रतिम गुंफा म्हणजे भाजे लेणी. मुंबईपासून ११० तर पुण्यापासून ७० किमी अंतराचे हे ठिकाण शनिवारी, रविवारी खूपच गजबजलेले असते. पावसाळ्यात या लेण्यांच्या परिसरातील डोंगरातून वाहणारे नयनरम्य धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
येथील डोंगरात सुमारे बावीस लेण्या कोरल्या असून, या लेण्यांच्या मध्यभागी एक चैत्यगृह आहे. याची चैत्यकमान पिंपळपानाच्या आकाराची असून, उर्वरित एकवीस विहार चैत्यगृहाच्या दोन्ही बाजूंना पसरलेले आहेत. येथे चैत्यगवाक्षांच्या माळा व त्यांना लागून कोरीव सज्जे आहेत. यातील काही सज्ज्यांवर कोरीव कामातून जाळी व पडद्यांचा सुंदर आभास निर्माण केलेला आहे. वेदिकापट्टींवर नक्षीदार कोरीवकाम, दगडात कोरलेल्या कड्या सर्वच नेत्रदीपक असून, गवाक्षातून युगुले कोरलेली विलोभनीय वाटतात. या यक्षिणीच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते. चैत्यगृहाच्या आकार मोठा असून, त्यात सत्तावीस अष्टकोनी खांब व मधोमध स्तूप आहे. या चैत्यगृहाला लाकडी तुळ्यांचे छत असून, स्तूपाच्या मागील काही खांबांवर ध्यानस्थ बुद्धांच्या चित्र प्रतिमांचे पुसटसे अंश दिसतात. तुळ्यांवर ब्राह्मी लिपितील लेख आढळतात.
चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचे स्रोत असून येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंगाचे पट, सालंकृत शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्यस्तूपाचे नक्षीकाम कोरलेले आहे. यात सूर्य व इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. भाजे ही प्राचीन लेणी असल्याने अनेक देशी विदेशी अभ्यासकांची येथे कायम वर्दळ असते.
>पवन मावळातील सर्वांत जुनी बेडसे लेणी
कामशेत शहराजवळील बेडसे गावापाशी भातराशीच्या डोंगर रांगेमध्ये असलेली बेडसे ही दुर्मिळ लेणी कार्ला व भाजे या लेण्यांपेक्षाही जुनी असून, मावळात प्रथम कोरलेली लेणी आहे, असे अभ्यासक सांगतात. कामशेत शहरापासून पवनानगरमार्गे साधारण ८ किलोमीटर अंतरावर बेडसे गाव आहे. गावापासून लेणीच्या पायथ्यापर्यंत वाहने जात असून, पुढे लेणीपर्यंत जाण्यासाठी पुरातत्त्व विभागाने दगडी पायºया बांधल्या असल्याने लेणीवर सहज पोहचता येते. बेडसे पवनानगर रोडवरून ही लेणी दिसत असून, तिच्या बाजूला सुंदर धबधबा खळखळताना दिसतो.
बेडसे लेणीत एक चैत्यगृह असून, उजवीकडे छोट्या कोरीव गुहा व स्तूप आहे. तसेच समोरील बाजूस पाण्याच्या टाक्या व त्यावर ब्राह्मी लिपीत दान देणाºयांचे नावे कोरली आहेत. चैत्यगृहाची रचना सुंदर असून, दोन खांबांवर तोलून धरलेले छत विलोभनीय दिसते. या खांबांची रचना षट्कोनी असून, वरच्या बाजूस अनेक यक्ष किन्नरांच्या मूर्ती कोरल्या आहेत. येथील कोरीव हत्ती इतके सुबक आहेत की ते जिवंत भासतात. ठिकठिकाणी चक्र, कमळ व
स्तुपावरील वेदी, मेढी, हर्मिका अजूनही चांगल्या स्तिथीत असून, हर्मिकवरचे लाकडी छत्र सुमारे दोन हजार वर्षे जुने असूनही चांगल्या स्थितीत आहे. या लेणीवरून किल्ले तिकोना तसेच पवन मावळचे विहंगम दृश्य नजरेस पडते. बेडसे, तिकोना किल्ला, भाजे, कार्ला लेणी हा जुना मार्ग होता. पवना धरणाकडे जाताना या लेणीला भेट द्यावी हे प्रत्येक पर्यटकाच्या मनात असते.
>पाल लेणी व नाणेतील धबधबे
नाणे मावळात वर्षाविहारासाठी अनेक स्थळे असून, त्यातीलच एक पाल व उकसान गावातील डोंगर दºयांतून खळखळणारे धबधबे व पुरातन दुर्लक्षित अर्धवट कोरलेल्या लेण्या. मावळातील सह्याद्रीच्या दºयाखोºयांत गडकिल्ल्यांची रास असून, त्याचप्रमाणे पुरातन लेण्यादेखील इतिहासाला साद घालताना दिसतात. पाल व उकसान गावच्या लेण्या कार्ला, भाजे लेण्या इतक्या प्रसिद्ध नसल्या तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
कामशेत शहरातून नाणे मार्गे गोवित्री गावाच्या पुढे कुंडलिका नदीच्या अलीकडे उकसान गावाकडे जाण्यासाठी फाटा आहे. उकसान गाव व अलीकडे पाल गाव येथे जाताना दिसणारी निसर्गसृष्टी पाहिल्यास मन प्रसन्न होते. या गावांच्या तीनही बाजूला वडिवळे धरणाच्या पाण्याचा विळखा असल्याने उंच डोंगरावरून ही गावे धरणातील बेटे असल्याचा भास होतो.
उकसान गावाच्या बाजूला असणाºया डोंगरमाथ्यावर चालत गेल्यास पुढे डोंगराच्या कातळात एक गुहा दिसते. हीच उकसानची लेणी. त्याशेजारीच एक सुंदर धबधबा असून, गावातील प्राथमिक शाळेपासूनही हे मनोहर दृश्य दिसते. ही लेणी मुखाला ८ फूट उंच व ९ फूट रुंद असून यात प्रवेश केल्यास आत मोठी गोलाकार गुहा कोरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. याच प्रमाणे पाल लेणी देखील अर्धवट कोरलेली असून या लेणीमधील गुहेत एक विहार व बसण्यासाठी एक सज्जा कोरला आहे. या गुहेच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर एक शिलालेख असून ब्राह्मी लिपितल्या या शिलालेखाची सुरुवात ‘नमो अरिहंतान’ ने होते.
>कार्ला लेणी
मळवली गावाजवळ मुंबई-पुणे महामार्गाजवळ वेहेरगाव म्हणून गाव आहे़ या गावाच्या डोंगरावर कार्ले लेणी वसलेली आहे. या लेण्यांचा काळ इ़स़ऩ पहिल्या शतकातील आहे़ कार्ले लेणीतील चैत्यगृह हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे चैत्यगृह आहे़ एक मोठे स्तूप आहे आहे़ लेणीमध्ये छताला असलेल्या कमानीचे लाकूड हे २००० वर्षांपूर्वीचे असून, अद्याप खराब झालेले नाही़ कार्ले लेणीच्या मुखाशी असणारे सिंहस्तंभ हे सर्वांचे लक्ष वेधून घेते़ कार्ले लेणीमध्ये स्तंभावर हत्ती, स्त्री-पुरुष जोड्या कोरलेल्या आहेत़ या लेणीमध्ये एकूण २२ शिलालेख आहेत़ या मध्ये हे लेणं कोरण्यासाठी ज्यांनी ज्यांनी दान दिले त्यांच्या बद्दल माहिती आहे़
संकलन : चंद्रकांत लोळे