बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश; ३२ लाख ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 08:21 PM2021-07-12T20:21:23+5:302021-07-12T20:22:04+5:30

निगडी पोलिसांचा सलग अठरा दिवस तपास; महाराष्ट्र, गुजरात राज्यांमध्ये कारवाई...

Exposing interstate racket making fake notes; notes worth Rs 32 lakh 67 thousand seized | बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश; ३२ लाख ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश; ३२ लाख ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Next

पिंपरी : बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा निगडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये ही कारवाई करत निगडी पोलिसांनी ३२ लाख ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ओटास्कीम निगडी येथून सुरू झालेली कारवाई पंढरपूर, सातारा, मुंबईमार्गे गुजरातपर्यंत गेली. महाराष्ट्रातून तीन, तर गुजरातमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

गोरख दत्तात्रय पवार (वय ३०, रा. भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), विठ्ठल गजानन शेवाळे (वय ३८, रा. ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा), जितेंद्र रंकनीधी पाणीग्रही (वय ३६, रा. नालासोपारा (पुर्व) वसई पालघर), राजू उर्फ रणजीत सिंह खतुबा परमार (वय ३८, रा. रानपुर काकरिया चौरा, ता. रानपूर, जि. बोटाद, गुजरात), जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल (वय २६), किरण कुमार कांतीलाल पटेल (वय ३८, दोघे रा. पालनपूर, गुजरात) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीमधील ओटास्कीम परिसरात एक व्यक्ती नकली नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपी गोरख पवार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन हजार रुपयांच्या पन्नास नोटा आढळून आल्या.

तसेच त्याच्याकडे असलेल्या दुचाकीमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचे चार बंडल आढळले. सर्व नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी गोरख पवारला अटक केली. त्याच्याकडून पाच लाख ८६ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

आरोपी गोरख पवारला त्याचा सातारा जिल्ह्यातील मित्र विठ्ठल शेवाळे याने नोटा दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस विठ्ठल शेवाळे याच्या ढेबेवाडी गावात पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले. शेवाळे याच्याकडून तीन लाख ७० हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या.

शेवाळे याने नालासोपारा पूर्व वसई येथील जितेंद्र पाणीग्रही याच्याकडून नोटा आणल्याचे सांगितले. पोलीस जितेंद्र याच्या घरी गेले असता त्याला मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक जुलै रोजी आरोपी जितेंद्रला न्यायालयातून वर्ग करून घेतले.

जितेंद्रने त्याचा गुजरात येथील साथीदार आरोपी राजू परमार याच्याकडून बनावट नोटा आणल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या वास्तव्याबाबत कोणतीही माहिती नसल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याची माहिती मिळवली. गुजरातमधील म्हैसाना येथे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून आरोपी राजूला एका लॉजवर बोलावले. मात्र, राजूने पोलिसांना दिवसभर ताटकळत ठेवले.

त्यानंतर पुन्हा निगडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे राजूचा ठावठिकाणा शोधला. पालनपूर येथे जाऊन आरोपी राजू परमारला अटक केली. त्याच्याकडून १५ लाख ९३ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

आरोपी परमारने त्याच्याकडील बनावट नोटा जितेंद्रकुमार आणि किरणकुमार यांच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी जितेंद्रकुमार आणि किरणकुमार यांच्या घरून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पालनपुर येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेतली. त्यानंतर आरोपी जितेंद्रकुमार आणि किरणकुमार या दोघांकडून बनावट नोटा बनविण्यासाठी वापरलेला लॅपटॉप, कलर प्रिंटर जप्त केला.

सलग अठरा दिवस तपास

२४ जून रोजी या तपासाला निगडी पोलिसांनी सुरुवात केली. त्यानंतर सलग तब्बल १८ दिवस पोलिसांनी पुणे, सातारा, मुंबई आणि गुजरातमधील पालनपूर येथे तपास केला. दोन हजारांच्या १ हजार ४०२, पाचशे रुपयांच्या ९२९ असा एकूण ३२ लाख ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच लॅपटॉप, कलर प्रिंटर, दुचाकी असा एकूण ३३ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Exposing interstate racket making fake notes; notes worth Rs 32 lakh 67 thousand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.