पुणे : राज्यभरात दि. १ ते २० ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) तसेच दि. ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) पूर्व परीक्षेसाठी एसटी महामंडळाकडून जादा बस बस सोडण्यात येणार आहेत. त्यानुसार एसटीच्या पुणे विभागातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा केंद्राकडून राज्यात दि. १ ते २० ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन पध्दतीने प्रवेश परीक्षा होणार आहेत. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये १८० केंद्र असून सुमारे ५ लाख ४१ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा केंद्रांची ठिकाणे असलेल्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी एसटीकडून बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच दि. ४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ३८ उपकेंद्रांवर युपीएससीची परीक्षा होणार आहे. त्यासाठी दि. ३ ते ५ ऑक्टोबर आणि ११ ऑक्टोबर रोजी असे चार दिवस जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. या बससाठी विद्यार्थ्यांनी लांब पल्ला व मध्यम लांब पल्ल्याच्या फेऱ्यांचे आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.
वाहतुक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातून परीक्षांच्या दिवशी नियमित बससेवा सुरू असेल. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आरक्षण केल्यास किंवा त्याबाबत विविध ठिकाणांहून एकत्रित ने-आण करण्याची पूर्वकल्पना दिल्यास त्यानुसार नियोजन करता येईल.’