शिक्षा सुनावणी वेळी विलक्षण स्तब्धता

By admin | Published: May 10, 2017 04:17 AM2017-05-10T04:17:46+5:302017-05-10T04:17:46+5:30

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील नव्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर पूर्व बाजूच्या कोपऱ्यात विशेष सत्र न्यायालय आहे.

Extraordinary numbness at the hearing of the hearing | शिक्षा सुनावणी वेळी विलक्षण स्तब्धता

शिक्षा सुनावणी वेळी विलक्षण स्तब्धता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील नव्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर पूर्व बाजूच्या कोपऱ्यात विशेष सत्र न्यायालय आहे. या न्यायालयामध्ये नयना पुजारी खून खटल्याचे कामकाज निकालाच्या अंतिम टप्प्यात आल्याने सलग २ दिवस खूप गर्दी झाली. अनेक तास उभे राहून जाणकार आणि नवोदित वकील, पोलीस आणि नागरिक तसेच प्रसारमाध्यमांनी हे कामकाज पाहिले. सकाळी साडेदहापासूनच न्यायालयात पाय ठेवायलाही जागा नव्हती.
न्यायालयातील पश्चिम बाजूच्या भिंतीजवळ आरोपींची बसण्याची जागा, अर्थात लाकडी पिंजरा होता. आरोपींपर्यंत न्यायाधीशांचा आवाज पोहोचावा, यासाठी तो हलवून पुढे आणण्यात आला. १० वाजून ४५ मिनिटांनी आरोपींना न्यायालयाबाहेर आणून थांबविण्यात आले. ११ वाजून ५ मिनिटांनी पिंजऱ्यातील बाकावर बसविण्यात आले. राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या क्रमाने आरोपींना लाकडी पिंजऱ्यात बसविण्यात आले. त्यांच्याभोवती चौफेर पोलिसांचे कडे होते. माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याला आधीच न्यायालयात हजर करून न्यायासनाच्या उजव्या बाजूला बसविण्यात आले होते.
न्यायालयात ११च्या सुमारास खूप गर्दी झाली. त्यामुळे पुजारी कुटुंबीयांनाही काही वेळ उभेच राहावे लागले. ११ वाजून ५ मिनिटांनी न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर न्यायासनावर स्थानापन्न होताच नि: शब्द शांतता पसरली. ११ वाजून १६ मिनिटांनी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर न्यायालयात आले. आरोपींना क्रमवार न्यायासनासमोर आणण्यात आले. दोषी ठरविल्याबाबत काही सांगायचे आहे का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्या वेळी राऊत याने ‘आपल्याला कमीत कमी शिक्षा द्यावी. मला माझ्या आई, पत्नी व मुलीला पाहायलाही मिळालेले नाही,’ असे सांगितले. लाकडी पिंजऱ्यात परत आणून बसविल्यानंतर त्याला रडू कोसळले. ११ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास निंबाळकर यांनी युक्तिवाद सुरू केला. दुपारी १२.५५ पर्यंत तो सुरू होता. इंग्रजीमध्ये निंबाळकर यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. ‘ज्या समाजात महिला सुरक्षित असतात, तो समाज प्रगत असतो,’ या स्वामी विवेकानंदांच्या वक्तव्याचा संदर्भही त्यांनी दिला.
नयनाला न्यायासाठी ७ वर्षे लढत राहिलो -
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नयना माझी प्रेरणा आहे. कधी तरी ‘नर्व्हस’ व्हायला होतं. सगळ्यापासून लांब जावंसं वाटतं. पण मी गेलो, तर नयनाला न्याय कोण मिळवून देणार? ही भावना होती. त्यामुळे ७ वर्षांपासून लढा देत राहिलो, असे नयना पुजारी यांचे पती अभिजित पुजारी यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘पीडित व्यक्तीच्या घरातील लोकांची काय परिस्थिती होते, हे त्यांनाच माहिती असते. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहरात ही घटना घडली होती. अशा प्रकारच्या खटल्यांची सुनावणी लवकर होऊन निकाल लागला आणि कठोर शिक्षा झाली, तर असे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही.’’
महिलांच्या असुरक्षिततेच्या मुद्द्यांवर चर्चा, निर्णय होतात; त्यांची कठोर अंमलबजावणी व्हायला हवी.
तपासात पोलिसांकडून नकळत त्रुटी राहतात. परिणामी, गुन्हेगार सुटतात. त्यामुळे महिलांसंदर्भातील अत्याचाराच्या घटनांचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांचे मार्गदर्शनही हवे. पोलिसांना सक्षम सुविधा पुरवायला हव्यात. वेगाने तपास करण्यासाठी पोलिसांना सक्षम करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.
सहा महिन्यांच्या आत गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी. समाज म्हणून अशा घटनांबद्दल सजग राहायला हवे; तरच प्रशासनावर आणि सरकारवर वचक बसेल. घटना रोखता येतील आणि न्याय मिळेल, असे मत अभिजित यांनी व्यक्त केले.

Web Title: Extraordinary numbness at the hearing of the hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.