फेसबुक मैत्री महिलेला पडली महागात :महागड्या गिफ्टच्या आमिषाने लाखोंचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:28 PM2019-01-24T17:28:26+5:302019-01-24T17:32:01+5:30
फेसबुकवर ज्येष्ठ नागरिकांशी मैत्री करुन त्यांच्याशी गोड बोलून मैत्री वाढून परदेशातून महागडे पार्सल पाठविले असल्याचे आमिष दाखवून ते कस्टमने अडविल्याचा बहाणा करुन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत.
पुणे : फेसबुकवर ज्येष्ठ नागरिकांशी मैत्री करुन त्यांच्याशी गोड बोलून मैत्री वाढून परदेशातून महागडे पार्सल पाठविले असल्याचे आमिष दाखवून ते कस्टमने अडविल्याचा बहाणा करुन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. मॉडेल कॉलनीत राहणारी एक ज्येष्ठ नागरिक महिला या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अलगद सापडली़ त्यांनी सव्वा चार लाख रुपयांना गंडा घातला.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ऑस्कर वॉलकॉट, रुषिका आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मॉडेल कॉलनीमधील एका ६० वर्षाच्या निवृत्त महिलेने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार १६ जुलै ते २७ डिसेंबर २०१८ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिला निवृत्त झाल्या असून त्यांची गेल्या वर्षी ऑस्कर वॉलकॉट नावाच्या व्यक्तीशी फेसबुकवर मैत्री झाली़. त्यानंतर त्यांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर शेअर केले़ वॉलकॉट याने या महिलेला एक महागडे पार्सल पाठविले असल्याचे सांगितले़. त्यानंतर रुषिका असे नाव सांगणाऱ्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला़. कस्टमने तुमच्या नावाने आलेले पार्सल अडविले असून त्याची कस्टम ड्युटी द्यावी लागेल, असा बहाणा करुन त्यांना बँक खात्यात वेळोवेळी ३ लाख ५७ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले़. त्यानंतर दोघांनी त्यांना बँकेतून बोलत असून त्यांच्या अकाऊंटची माहिती घेऊन पेटीएम द्वारे त्यांच्या बँक खात्यातून ६४ हजार १३६ रुपये काढून घेतले़. त्यांनी नंतर वॉलकॉट याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला़ पण त्याचा संपर्क होत नव्हता व पार्सलही मिळाले नाही़. तसेच बँक खात्यातून परस्पर पैसे काढले गेल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़.