फडणवीस-पाटील थकले म्हणून राणेंना पुढे केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:12 AM2021-06-09T04:12:21+5:302021-06-09T04:12:21+5:30
पुणे: महाविकास आघाडीवर टीका करून करून देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील थकले म्हणूनच बहुधा भाजपाने आता नारायण राणे यांना ...
पुणे: महाविकास आघाडीवर टीका करून करून देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील थकले म्हणूनच बहुधा भाजपाने आता नारायण राणे यांना पुढे केले असावे, असा टोला काँग्रेसने भाजपाला लगावला आहे.
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी पुण्यात येऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर असंसदीय भाषेत टीका केली. असंघटित कामगार काँग्रेसच्या कोथरूडमधील कार्यक्रमात प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. “राणे काय बोलतात, कसे बोलतात हे सर्वांना माहिती आहे. नाना पटोले मुद्देसूद बोलू लागल्यानेच भाजपाची चिंता वाढू लागली व त्यांंनी फडणवीस पाटील बाजूला करून राणे यांंना आणले,” असे तिवारी म्हणाले.
असंघटित कामगार, रिक्षाचालक यांना काँग्रेसच्या वतीने तिवारी यांच्या हस्ते हँडग्लोव्हज, सॅनिटायझर मास्क वाटप करण्यात आले. अध्यक्ष सुनील शिंदे तसेच राजाभाऊ मराठे, नगरसेविका वैशाली मराठे, विजय खळदकर, संदीप मोकाटे, घनशाम निम्हण, महेश विचारे आदी यावेळी उपस्थित होते.