रश्मी शुक्ला यांच्या नावे २५ लाखांची खंडणी मागितल्याची आपल्याविरुद्ध खोटी तक्रार; पुण्यात आणखी एक प्रकरण चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 09:39 PM2021-04-28T21:39:21+5:302021-04-28T21:39:49+5:30
रश्मी शुक्ला यांचे टेलिफोन टॅपिंग प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. त्या अनुषंगाने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
पुणे : टेलिफोन टॅपिंग प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नावे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची आपल्याविरुद्धची तक्रार खोटी असून शासनाने या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी करुन आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी निवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला धनंजय धुमाळ यांच्या समवेत त्यांचे वकील रमेश जाधव उपस्थित होते.
रश्मी शुक्लापुणे पोलीस आयुक्त असताना पॉपर्टी सेलचे पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी त्यांच्या नावे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण गाजले होते. त्यावरुन त्यांना निलंबित करण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांचे टेलिफोन टॅपिंग प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. त्या अनुषंगाने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
धनंजय धुमाळ यांनी सांगितले की, तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावाने संदीप जाधव यांच्याकडून २५ लाख रुपये मागितल्याच्या खोट्या आरोपाखाली आपल्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती आणि निलंबन करण्यात आले होते.
या प्रकरणातील ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिगसारखे पुरावे बनावट आणि फेरफार केलेले होते. मुळ पुरावा प्राथमिक चौकशी अधिकार्यांनी न मिळवता बनावट रेकॉर्डिंगच्या आधारावर चौकशी आणि कारवाई केली.
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार आपण बालेवाडी येथील जमिनीवर बेकायदेशीर ताबे मारलेल्या तक्रारीची २०१६ साली चौकशी करत होतो. पोलीस ठाण्यांकडून योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्याने त्यांना आजही न्याय मिळालेला नाही.
आपल्याविरुद्ध झालेल्या कारवाईविरोधात आपण अपील केले असून त्यावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी आपली मागणी असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.