मार्केट यार्डात दुर्गंधीचे साम्राज्य, बाजार घटकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:39 PM2017-09-17T23:39:20+5:302017-09-17T23:39:24+5:30
सडलेला भाजीपाला, फळांचे ढीग.. प्लॅस्टिक, कचºयाचे साम्राज्य.. पाऊस व घाणीमुळे झालेली प्रचंड दलदल... घाणीवर फिरणारी डुकरे... याच परिस्थितीत व्यापारी आपला माल लावून बसलेत व ग्राहक नाकाला रुमाल लावून मालाची खरेदी करतात
पुणे : सडलेला भाजीपाला, फळांचे ढीग.. प्लॅस्टिक, कच-याचे साम्राज्य.. पाऊस व घाणीमुळे झालेली प्रचंड दलदल... घाणीवर फिरणारी डुकरे... याच परिस्थितीत व्यापारी आपला माल लावून बसलेत व ग्राहक नाकाला रुमाल लावून मालाची खरेदी करातात... असे चित्र आशिया खंडातील सर्वांत मोठी समजल्या जाणा-या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील. सेसच्या रूपाने करोडो रुपये गोळा करणा-या बाजार समितीच्या प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
छत्रपती शिवाजी मार्केट याडातील फळे व भाजीपाला विभागात घाणीचे साम्राज्य पसरले असून, बाजार घटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने व कायमस्वरूपी स्वच्छता न केल्यास आडते असोसिएशन आंदोलन करणार असल्याचा इशारा अध्यक्ष विलास भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे़
पुणे बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजार समिती मानली जाते. येथे राज्याच्या कानाकोप-यातून व अन्य राज्यातील व्यापारी माल घेऊन येतात. परंतु गेल्या काही दिवसांत येथे घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान, याबाबत बाजारातील स्वच्छतेबाबतचा प्रश्नाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पणन संचालक तसेच स्थानिक आमदारांना निवेदन देऊन त्यांनी कोणत्याही क्षणी बाजारात भेट देऊन येथील अस्वच्छतेची माहिती घ्यावी, अशी विनंती त्यांना करण्यात येणार आहे़
>आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबविले आहे. मात्र पुणे बाजार समितीत आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, येथे सर्वत्र अस्वच्छता असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचेच प्रशासक मंडळ येथे कार्यरत आहे, असे असतानाही चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच स्वच्छ भारत अभियानास हरताळ फासला जात असल्याची चर्चा बाजार घटकांमध्ये रविवारी दिवसभर होती.
>पदाधिका-यांकडे वारंवार पाठपुरावा
तरकारी विभागात गेल्या ३८ वर्षांच्या इतिहासात इतकी प्रचंड दुर्गंधी कधीच नव्हती. मार्केटमध्ये शहर-ग्रामीण भागातील लहान-मोठे व्यापारी व हजारो नागरिक दररोज भाजी खरेदी करण्यासाठी येतात.
सध्या शहरामध्ये स्वाइन फ्ल्यू व इतर साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. मार्केट यार्ड येथील दुर्गंधीमुळे यामध्ये अधिकच भर पडत आहे. याचा थेट परिणाम शहराच्या आरोग्यावर होत आहे. परंतु याकडे बाजार समितीचे अधिकारी अथवा पदाधिकारीदेखील लक्ष देत नाहीत.
बाजारातील दुर्गंधीबाबत आडते असोसिएशनचे अधिकारी आणि पदाधिकाºयांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे़ त्यांच्याशी सतत संपर्क साधला जात आहे, मात्र ते कसल्याही प्रकारची दाद देत नाहीत, असे विलास भुजबळ यांनी सांगितले.
>पुनर्विकासाच्या नुसत्याच बाजार समितीच्या गप्पा
करोडो रुपये खर्च करुन पुनर्विकास केला जाणार असल्याच्या गप्पा बाजार समितीकडून मारल्या जात आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीस सेसच्या रुपाने करोडो रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या तुलनेतच त्यांनी बाजार घटकांना सर्वोत्तम मूलभूत सुविधा द्यायला पाहिजेत, मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे स्वच्छता व मूलभूत सुविधांवर खर्च दाखविण्यात येतो तो पैसा जातो कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. हे प्रश्न न सुटल्यास आंदोलन करु़
- विलास भुजबळ, अध्यक्ष,
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन