पुणे : पुढील तीन दिवस १०० टक्के लॉक डाऊन राहणार, मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहणार अशी माहिती देणारा व्हिडिओ सोमवारी दुपारी व्हायरल झाला. या व्हिडिओची सत्यता न पडताळता व वरिष्ठांकडून कोणतेही आदेश नसताना एका पोलीस कर्मचार्यांनी विमानतळ परिसरात दुचाकीवरील माईकवरुन सर्वत्र चुकीची माहिती प्रसारीत केली. त्यामुळे विमानतळ परिसरात एकच घबराट पसरली. याबाबत आम्ही चौकशी करणार असून या कर्मचार्याने फेक व्हिडिओ पाहून चुकीची माहिती प्रसारित केली असल्याचे दिसून येते. त्याबाबतचा खुलासा आम्ही ट्विटरवर केला असल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
याबाबतची माहिती अशी, पुढील तीन दिवस १०० टक्के लॉक डाऊन राहणार असून त्यात सकाळच्या वेळी केवळ दुध विक्री दुकाने उघडी राहतील. मेडिकल वगळता सर्व दुकाने १०० टक्के बंद राहणार असल्याची सुचना पोलीस व्हॅन देत असल्याचा व्हिडिओ सोमवारी दुपारपासून शहरात व्हायरल झाला. त्यात पुण्यात आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याने तो आणखीच व्हायरल होऊन लोकांमध्ये घबराट पसरली.
हा व्हिडिओ पाहून विमानतळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी सपकाळ यांनी हा व्हिडिओ खरा मानून त्याची सत्यता न पडताळणी करता त्यांच्या दुचाकीला असलेल्या माईक वरुन पुढील तीन दिवस सर्व बंद राहणार असल्याची अनाऊन्समेंट करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होऊ लागला. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, सपकाळ यांनी फेक व्हिडिओ पाहून त्यात सांगितल्याप्रमाणे चुकीची माहिती आपल्याकडील माईक वरुन प्रसारित केली आहे.
सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, संबंधित कर्मचार्यांची चौकशी केली जाईल. त्यांनी फेक व्हिडिओ पाहून ही अनाऊन्समेट केली असावी. मात्र, रात्री उशिरा पोलिसांनी त्याबाबत योग्य तो खुलासा केला आहे. पुण्यात नेहमी प्रमाणेच लॉक डाऊन राहणार असून अत्यावश्यक सेवा किराणा दुकाने, मेडिकल व दुध विक्री सुरु राहणार आहे.तीन दिवस सर्व बंदचा व्हायरल होणारा व्हिडिओ आणि चौका चौकात तशीच माहिती देणारा पोलीस कर्मचारी यामुळे शहरात तसेच विमानतळ परिसरात मोठ्या घबराट निर्माण झाली होती.