‘त्यां’नी बोेगद्यातच थाटलाय संसार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:41 AM2019-11-21T11:41:34+5:302019-11-21T11:45:12+5:30
स्वत:चा जीव धोक्यात घालून हे कामगार पावसाशी व कडाक्याच्या थंडीशी दोन हात करीत हिमतीने प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र कार्यरत आहेत. मुंबई-पुणे अप रेल्वेमार्ग दुरुस्ती
तेजस टवलारकर -
पुणे : मुंबई-पुणे यांना जोडणारी जीवनवाहिनी म्हणजे रेल्वे; परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये या रेल्वेमार्गावर सातत्याने दरडी कोसळणे, रेल्वे मार्गावर पाणी साचणे अशा प्रकारचे अडथळे निर्माण झाले. त्यामुळे अनेकदा गाड्या रद्द करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. रोज नव्याने उभ्या राहणाऱ्या या संकटांवर मात करीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यादृष्टीने दिवसरात्र युद्धपातळीवर काम सुरू आहे; पण या पुनर्निर्मितीच्या कामात तिथे राबणाऱ्या कामगारांची अवस्था फारच हलाखीची आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून हे कामगार पावसाशी व कडाक्याच्या थंडीशी दोन हात करीत हिमतीने प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र कार्यरत आहेत.
मुंबई-पुणे अप रेल्वेमार्ग दुरुस्तीच्या कामासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील कामगार आहेत. तसेच, कोकणातील कामगारसुद्धा येथे काम करीत आहेत. या कामगारांनी मंकी हिलच्या बोगद्यातच आपला संसार थाटला आहे. तेथेच जेवण, झोपण्यासह ही सर्व कामगारमंडळी जीव धोक्यात घालून वास्तव्याला आहे. अडीच किलोमीटरच्या अंतरातील बोगद्यातच जवळपास ४० कामगार राहतात. या कामगारांना दिवसाला ३०० रुपये पगार दिला जातो. त्यांना कोणतेही साहित्य लागले, तर थेट लोणावळा गाठावे लागते.
मंकी हिल परिसरात ५ नोव्हेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्या पावसातही कामगार बोगद्यातच राहत होते. दºयाखोºया, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, थंडी अंगावर घेत हे कामगार काम करीत आहेत. तिथे चालण्याकरिता जागा नाही, खाली पायाला रुतणारे दगड, कधीही कोसळणाºया दरडी अशा हलाखीच्या परिस्थितीत ही मंडळी पोटापाण्यासाठी जीव धोक्यात घालून दिवसरात्र राबत आहेत.
दगडावर कामगार झोपत आहेत. रोजच काहीना काही अपघात हा होतोच, असे काही कामगारांचे सांगितले. रेल्वे प्रशासनाकडून प्रथमोपचारांसह डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे.
............
रोजच मैलोन् मैल चालावे लागते
ज्या भागात काम सुरू आहे. त्या ठिकाणी मालगाडी जाणे शक्य नसल्यामुळे दूर अंतरावर मालगाडी उभी करावी लागते. तेथून सर्व साहित्य घेऊन पायी जावे लागते.
.........
दरड कोसळणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागते. त्यासाठी काही कामगार डोंगरावर जाऊन पाहणी करीत असतात.
.........
हवामानापुढे हतबलता
मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. आता हिवाळा सुरू झाला आहे; त्यामुळे रोजच थंडी आणि धुक्यांचा सामना कामगारांना करावा लागत आहेत. हवामानामुळे बºयाच वेळा अडचणी येत आहेत. त्यामुळे काम करण्याला मर्यादा येत आहेत.
.........