पुणे : नागरिकांना छोट्या-छोट्या तक्रारी घेऊन महापालिका तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागू नयेत, याकरिता महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मोबाइल अॅप, ईमेल, व्हॉट्स अॅप, एसएमएस, फेसबुक, टिष्ट्वटर या सोशल मीडियाद्वारे घरबसल्या तक्रार नोंदविण्याची सुविधा दिली. मात्र प्रत्यक्षात त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तक्रारींची दखल न घेतली जाणे, तक्रार न सोडविताच तक्रार सुटल्याचा मेसेज पाठविणे, पाणीपुरवठ्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांना वर्ग न होणे आदी अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. घरासमोर कचरा साठलाय... ड्रेनेजलाइन तुंबलीय... पाण्याची पाइपलाइन फुटलीय... रस्ता उखडलाय... अनधिकृत बांधकाम झालंय यांसह अनेक छोट्या-छोट्या तक्रारींसाठी पूर्वी नागरिकांना वॉर्ड आॅफिस, महापालिका येथे चकरा माराव्या लागायच्या. त्यांच्या या फेऱ्या बंद व्हाव्यात, याकरिता आॅनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा महापालिकेने १ जानेवारी २०१५ पासून उपलब्ध करून दिली आहे. मोबाइल अॅप, फेसबुक, व्हॉट्स अॅप, टिष्ट्वटर, फेसबुक, गुगल अशा सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आॅनलाइन तक्रारींचा निपटारा करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. यावर नोंदविलेल्या गेलेल्या प्रत्येक तक्रारींची नोंद ठेवली जात आहे. त्याचा अहवाल दररोज आयुक्तांना सादर केला जातो. तक्रार नोंदविली गेल्यानंतर ती विशिष्ट अधिकाऱ्याकडे वर्ग केली जाते. त्यानंतर त्या तक्रारीचे तातडीने निराकरण करण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यावर असते. मात्र अनेकदा अधिकाऱ्यांकडून तक्रारींचे निराकरण न करताच तक्रार सोडविली गेली असल्याचा अहवाल दिला जात आहे. तक्रार सुटली नसताना तसा मेसेज तक्रारदारांना आले आहेत. हडपसर येथील नागरिक अनिकेत राठी पालिकेच्या समस्येबाबत नियमितपणे मोबाइल अॅपवरून तक्रारींचा पाठपुरावा करतात. त्यांनी आतापर्यंत ८ तक्रारी पालिकेकडे नोंदविल्या. त्यापैकी त्यांची केवळ एकच तक्रार योग्यरीतीने सोडविली गेली. मात्र उर्वरित तक्रार सोडवणुकीचे अनुभव चांगले नसल्याचे ते म्हणाले. पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार वर्ग केल्यानंतर ती कोठे गेली आहे, याची माहिती मिळत नाही. (प्रतिनिधी)तक्रारीला १५ दिवस उलटले तरी परिस्थिती जैसे थेजंगली महाराज रस्त्यावरील सुप्रीम कॉर्नरजवळ एका पावसाळी गटारीची जाळी तुटली आहे. त्यामुळे अनेक पादचाऱ्यांचे पाय त्यामध्ये अडकून अपघात होत आहेत. मनसेचे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया यांनी ८ एप्रिल रोजी याचे फोटो काढून आॅनलाइन तक्रार नोंदविली. मात्र एक महिना उलटला तरी अद्याप त्याचे निराकरण झालेले नाही. त्यांना पालिकेच्या अधिकाऱ्याने फोन करून माहिती घेतली, मात्र पुढे काहीच केले नाही. नागरिकांच्या जीविताशी संबंधित महत्त्वाची तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.मोबाइल अॅपची माहितीच नाहीमहापालिकेने तक्रार नोंदविण्यासाठी ‘पुणे कनेक्ट’ नावाचे मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले, मात्र त्याची माहितीच नागरिकांपर्यंत पोहोचवली नाही. यामुळे खूपच कमी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. पालिकेकडे आतापर्यंत मोबाइल अॅपवरून केवळ १८४ तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. सर्वाधिक आॅनलाइन तक्रारी या संकेतस्थळावरून नोंदविल्या गेल्या असून त्याची संख्या ५ हजार ८८३ इतकी आहे.महापालिकेकडे जानेवारी ते एप्रिल २०१६ अखेरपर्यंत ८ हजार २८४ तक्रारी विविध माध्यमांमधून दाखल झाल्या, त्यातील ७ हजार ६११ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तक्रारींचे निराकरण करण्याचे प्रमाण ९३ टक्के असल्याची आकडेवारी महापालिकेकडून संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
आॅनलाइन तक्रारींचा फार्स
By admin | Published: May 07, 2016 5:27 AM