मंचर: सातगाव पठार भागातील पेठ, पारगाव, भावडी, कारेगाव, कुरवंडी, थुगाव, कोल्हारवाडी या गावांत उन्हाळ्यामध्ये आपल्या पशुधनासाठी शेतांमध्ये आजही कडब्याच्या पेंढ्यापासून मांडव तयार केला जातो. उन्हापासून आपल्या जनावरांचे संरक्षण व्हावे हा त्यामागचा उद्देश असतो.आपल्या मुक्या प्राण्यांना बळीराजा किती जीव लावतो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. याच पार्श्वभूमीवर सातगाव पठार भागातील पेठ येथील एका शेतकऱ्याने साधारण अडीच महिन्यांचा कालावधी खर्च करत ५० बाय २० फुटी मांडव हा ज्वारीचा कडबा व बांबुपासून तयार केला आहे. पण या मांडवाचे वैशिष्टये म्हणजे त्याची रचना हुबेहुब एखाद्या किल्ल्याप्रमाणे आहे. तसेच सोबतीला यावर्षी रायगडाची मेघडंबरी हा देखावा साकारला आहे. हा मांडव 'आकर्षणाचा केंद्रबिंदू' ठरत असून सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल झाला आहे.सातगाव पठार भागातील पेठ येथील शेतकरी दिलीप म्हातारबा पवळे यांनी आपल्या शेतात बैलांसाठी मांडव तयार करून त्याला किल्ल्याचे स्वरूप दिले आहे. त्यांच्याकडे शर्यतीसाठी धावणारी बैल त्यांच्याकडे असून जरी शर्यतींना बंदी असली तरी हे बैलांना प्रंचड जीव लावत त्यांचा सांभाळ करतात. लॉकडाऊनमुळे संचारबंदी सुरू असली तरी शेतीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतात कामासाठी निघालेले परिसरातील शेतकरी आवर्जून हा मांडव पाहून पुढे मार्गस्थ होतात. येथे भेट देणाऱ्या अनेकांना हा मांडव नसून एक किल्लाच आहे असा भास होतो. ज्वारी कडब्याच्या पेंढ्यांपासून तयार करण्यात आलेल्या या मांडवाला पाहण्यासाठी शेतकरी आवर्जून येत असतात. आपल्या मांडवरुपी किल्ल्याच्या दर्शनी भागात भाले, ढाली,तलवारी आदी वस्तू लावलेले आहेत. बैलगाडा शर्यत सुरू असताना आपल्या लाडक्या 'सर्जा राजां'ना बक्षिस म्हणून मिळालेली प्रशस्तीपत्रक देखील मांडवाच्या दर्शनी भागात लावलेली आहेत. रायगडाची मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भगवा ध्वजासहित दिसत आहे .हा मांडव बांधण्यासाठी त्यांना मुलगा शिवाजी, मुलगी पौर्णिमा, मित्रमंडळी आणि वस्तीवरील सहकारी यांची मोलाची साथ लाभली आहे.
दिलीप पवळे म्हणाले, बैलाला शेतकरी घरातील सदस्य मानतो. त्याला कुटुंबातील सदस्यप्रमाणे सांभाळले जाते दरवर्षी वेगळ्या प्रकारचा मांडव बनवला जातो. लॉकडाऊनमुळे बाहेर कुठे जाता येत नाही .त्यामुळे एक आगळावेगळा मांडव बनवण्याचा प्रयत्न केला आहे.बैलगाडा शर्यत बंदीमुळे बैल शर्यतीत पळत नसले तरी त्यांचा सांभाळ ह्यापुढेही चांगल्या पद्धतीने करणार आहे.