बारामती: शेतकऱ्यांचा विकासाला विरोध नाही तर बागायती पट्ट्यातून शेती उद्ध्वस्त करीत जाणाऱ्या मार्गाला तो विरोध आहे. विकास झालाच पाहिजे, याबद्दल दुमत नाही. राक्षसी महत्त्वकांक्षा बाजुला ठेवा. गोरगरीबांना मारून विकास नकोच आहे बुलेट ट्रेनचा प्रकल्प आमच्यावर लादू नका. हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास आपण पहिले आत्मदहन करू, असा इशारा देत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गाला विरोध केला.
मुंबई-हैदराबाद हाय स्पीड रेल्वेमार्ग बारामतीइंदापूर तालुक्यातून प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी(दि २२) बारामतीत येथे कवी मोरोपंत नाट्यगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पाेरेशनचे अधिकारी, श्याम चौगुले प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, डॉ. अर्पणा कांबळे,सत्यव्रत पांडे, प्राजक्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जाचक पुढे म्हणाले, बुलेट ट्रेनचा मार्ग हरित पट्ट्यातून नको आहे. या मार्गाऐवजी मुंबई-हैद्राबाद जुन्या मार्गालगतच बुलेट ट्रेनचा मार्ग न्यावा. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील हा पर्याय योग्य असल्याचे चर्चेदरम्यान सांगितल्याचे जाचक म्हणाले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर देखील याचा परिणाम होण्याची भीती जाचक यांनी व्यक्त केली. पहिला अहवाल वेगळा होता. नव्याने दिलेल्या अहवालात विशिष्ठ लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे. हे सर्व संशयास्पद असून हा आजिबात योगायोग नसल्याचा आरोप जाचक यांनी केला.
यावेळी हेमंत निंबाळकर यांनी या प्रकल्पामुळे परिसराची अवस्था ‘मुळशी पॅटर्न’ प्रमाणे होण्याची भीती व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांनी आजच्या बैठकीबाबत शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचली नसल्याची तक्रार केली. विक्रम निंबाळकर यांनी पालखी महामार्ग आणि बुलेट ट्रेन एकमेकांना ‘क्रॉस’ होत असल्याने चुकीचा सर्व्हे केल्याचे मत व्यक्त केले. प्रदीप शिंदे, निलेश टिळेकर यांनी बाजारभाव कसा ठरवणार असा सवाल व्यक्त केला. यावेळी विठ्ठल वणवे, प्रभाकर रणदिवे यांनी प्रश्न उपस्थित केले. अनिल शर्मा यांनी सांगितले की, हा प्रारूप आराखडा आहे. अंतिम सर्व्हे नाही. बुलेट ट्रेनचा वेग पाहता त्यासाठी आवश्यक बाबी विचारत घेऊन तज्ज्ञांनी सर्व्हे केला आहे. त्या विचारात घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. महामार्ग रेल्वेपेक्षा बुलेट ट्रेनचा प्रकल्प वेगळा आहे. हायस्पीड ट्रेनसाठी तांत्रिक गरज वेगळी असल्याचे मिश्रा म्हणाले.
...तूमच्या घरावरुन रेल्वे गेल्यावर समजेलसणसर येथील शेतकरी विक्रम निंबाळकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये यावेळी बैठकीदरम्यान शाब्दिक चकमक उडाली. यावेळी निंबाळकर यांनी त्यांचे या प्रकल्पात घर बाधित होत असल्याचे सांगताना उपस्थित अधिकाऱ्यांनी ‘ये कोई पॉलीटीकल डेबिट नहि है’ असे वक्तव्य केले. यावर संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी संंबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. माझे घर उध्द्वस्त होत आहे, ते मी पोटतिडकीने मांडत आहे, तूमच्या घरावरुन रेल्वे गेल्यावर समजेल, यात राजकारणाचा संबंध येता कुठे असा सवाल निंबाळकर यांनी केला. यावेळी पृथ्वीराज जाचक यांनी देखील शेतकरी आणि ‘पॉलीटीक्स’ चा काय संबंध असा सवाल केला. यावर सबंधित अधिकाऱ्यांनी नमते घेत सारवासारव केली.