नारायणगाव : अळिंबी लागवड प्रक्रिया क्लिष्ट नसल्याने शेतकर्यांना तिचे उत्पादन घेणे संयुक्तिक ठरू शकते , शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून अळिंबीकडे पाहावे, असे आवाहन अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्प पुणेचे कवक शास्त्रज्ञ डॉ. अशोक जाधव यांनी नारायणगाव येथे केले.
ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ- आखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्प, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अळिंबी लागवड तंत्रज्ञान’वर विशेष प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आयोजित केले होते. या वेळी ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रशांत शेटे, अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्प, पुणेचे कवक शास्त्रज्ञ डॉ. अशोक जाधव, डॉ. नामदेव देसाई, केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, तालुक्यातील येडगावचे योगिता मशरूम फार्मची योगिता भिसे आदी उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांना अळिंबी उत्पादनासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी आमच्यामार्फत सोडविण्यासाठी मदत केली जाईल. अळिंबीमध्ये पोषणमूल्ये अधिक असल्यामुळे त्याचा आहारामध्ये अंतर्भाव केल्यास ते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे.
पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे म्हणाले की, शेतकऱ्यांना अळिंबी उत्पादनासाठी प्रशिक्षित करून त्यांच्या मार्फत इतर शेतकऱ्यांना अळिंबीच्या लागवडीचा प्रचार करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. अळिंबीचे उत्पादन हे बंदिस्त जागेमध्ये घेता येत असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून कोणताही धोका पोहोचत नाही तसेच कमी उत्पादनखर्च व जास्त बाजारभावामुळे अळिंबी उत्पादनामधून चांगला नफा मिळू शकतो.
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रशांत शेटे म्हणाले की, कृषि विज्ञान केंद्रामार्फत प्रशिक्षण देऊन उद्योजक बनविण्याचे काम करण्यात येते तसेच अळिंबी उत्पादनासाठी राज्यात आपला भाग हा हब बनला पाहिजे यासाठी कृषि विज्ञान केंद्र व अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्प, पुणे यांनी संयुक्तरीत्या प्रयत्न करावेत. तसेच केव्हीकेमध्ये अळिंबी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्प पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. नामदेव देसाई यांनी अळिंबीपासून विविध उपपदार्थ याविषयी मार्गदर्शन केले व अळिंबी लागवड प्रात्यक्षिक उपस्थितांना करून दाखविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी केले .
०४ नारायणगाव
‘अळिंबी लागवड तंत्रज्ञान’ याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. अशोक जाधव.