पश्चिम भागातील शेतकरी आजही पारंपरिक शेतीतच अडकलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:25+5:302021-06-11T04:09:25+5:30

-- भोर : भोर तालुक्यातील बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे कृषी लागवड क्षेत्रात जरी वाढ होत असली तरी निर्सगाचा ...

Farmers in the west are still stuck in traditional farming | पश्चिम भागातील शेतकरी आजही पारंपरिक शेतीतच अडकलेला

पश्चिम भागातील शेतकरी आजही पारंपरिक शेतीतच अडकलेला

googlenewsNext

--

भोर : भोर तालुक्यातील बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे कृषी लागवड क्षेत्रात जरी वाढ होत असली तरी निर्सगाचा लहरीपणा, पाण्याचा अभाव व अर्थिक परिस्थितीमुळे पश्चिम भागातील शेतकरी आजही पारंपरिक शेतीत अडकलेला आहे. याउलट पूर्व भागातील शेतकरी दिवसेंदिवस पारंपरिक पद्धत सोडून यंत्राचा वापर करताना दिसत असून शेतीत बदल करून आधुनिक पद्धतीने शेती करताना दिसत आहे.

तालुक्यातील प्रमुख पिके भात असले तरी सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

भोर तालुक्यात १९७ गावे असून तालुक्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग पडतात. तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८६७७६ हेक्टर असून १५५ खरिपाची तर ४२ गावे रब्बीची आहेत. पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर तर रब्बी पिकाखालील क्षेत्र १७४०० हेक्टर आहे. तालुक्यात अडीच ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. भात हे प्रमुख पीक असुन ७४०० हेक्टवर भाताची लागवड केली जाते. त्यासाठी यावर्षी सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रावर भातरोपे वाटिकाची पेरणी करण्यात येणार आहे. भात लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असते. निसर्गाचा लहरीपणा, पाण्याचा अभाव व आर्थिक परिस्थिती यामुळे पश्चिम भागातील शेतकरी भात नाचणी वरई ही जिरायती शेती करतात. मात्र पाऊस पडला तर शेती पिकते अन्यथा उपासमार अशी अवस्था आहे.

या उलट पूर्व भागातील पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग परिसर व भोंगवली पट्टा या भागात नवनवीन यंत्राचा वापर करून आधुनिक पद्धतीने बागायती शेती केली जाते. या शिवाय पाॅलीहाऊसचा वापर करूनही शेती करतात. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न काढण्याचा येथील शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. तालुक्यात भाताबरोबरच सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात वाढ होत असून नसरापूर,उत्रोली, खानापूर, हातनोशी, भाबवडी, पिसावरे, नांदगाव, देगाव, नायगाव, कुरंगवडी यासह अनेक भागात ३ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड केली जाते. कृषी विभागामार्फत उत्पन्नवाढीसाठी रुंदसरी ओरंभा या पद्धतीचा आणि सुधारीत वाणाचा वापर केला जातो. खरीप भुईमूगदेखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून सुमारे ४ हजार हेक्टरवर लागवड केली जाते. पूर्व भागात ऊस, टोमॅटो, वांगी, भेंडी, काकडी, भाजीपाला ही पिके घेतली जातात. यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्यापासून आर्थिक फायदा मिळत आहे

शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी संकरीत आधुनिक पद्धतीने यंत्राच्या साह्याने भात लागवड तंत्रज्ञानाचा देखील प्रकल्प माळेगाव, हातवे तांबड, आळंदी, नाटंबी आदी भागात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येतो दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे.

चारसूत्री पद्धतीने वाताला करंजी बुद्रुक, खानापूर, रावडी, जयतपाड गृहिणी, आपटी आदी अनेक गावातील शेतकरी भाताची लागवड करतात तालुक्यातील ग्रामीण भागात पाच लागवड करण्यासाठी मजुरांऐवजी यंत्राच्या मदतीने चिखलणी लागवड केली जाते यात वाढ होत आहे. यामुळे मजुरांचा खर्च कमी होतो आणी उत्पन्न अधिक मिळत असल्यामुळे यंत्राचा वापर वाढला आहे. तालुक्यात पश्चिम भागात भाताची पेरणी पूर्ण होत आली असून पूर्व भागातील शेतकरी पेरणीला सुरुवात करत आहेत.

Web Title: Farmers in the west are still stuck in traditional farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.