मंचर: मुलींना तलावात पोहायला शिकवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना लांडेवाडी- चिंचोडी (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत शुक्रवारी घडली. रवींद्र महिपत आढळराव (वय ३९) असे बुडून मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत सुदैवाने दोन्ही मुली बचावल्या आहेत. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी रवींद्र महिपत आढळराव हे पत्नी आणि दोन मुलींसोबत लांडेवाडी येथील पांगारा वस्तीत राहतात. लॉकडाऊनमुळे सातवीत शिकणारी मुलगी रुचिका व दुसरीत शिकणारी मुलगी शुभ्रा या घरीच होत्या. रवींद्र आढळराव हे आपल्या दोन्ही मुलींना पोहायला शिकवायचे म्हणून चिंचोडी येथील तलावात पोहायला शुक्रवारी दुपारी गेले होते. त्यावेळी पावणे एकच्या सुमारास मुलींच्या ओरडण्याचा आवाज आल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यावेळी रवींद्र आढळराव हे पाण्यात बुडाले होते. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तलावातून बाहेर काढून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. रुचिका व शुभ्रा या दोन मुली बचावल्या आहेत. याबाबत सचिन आढळराव यांनी मंचर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.
मुलींना पोहायला शिकवताना वडिलांचा बडून मृत्यू; लांडेवाडी चिंचोडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 7:22 PM