ऑनलाईन फुड डिलिव्हरी करणाऱ्यांचे हेल्थ चेकअप केले नसल्यास एफडीए करणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:30 PM2019-03-26T14:30:05+5:302019-03-26T14:32:04+5:30
फुड डिलिव्हरी करणाऱ्यांचे हेल्थ चेकअप करणे कायद्याने बंधनकारक असून याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) करण्यात येणार आहे.
पुणे : अनेक ऑनलाईन अॅप्सच्या माध्यमातून फूड डिलिव्हरी नागरिकांच्या घरापर्यंत करण्यात येत आहे. यात माेठ्याप्रमाणावर स्पर्धा असल्याने नवनवीन अॅप बाजारात दाखल हाेत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये या फुड डिलिव्हरी करणाऱ्यांचे काही व्हिडीओ समाेर आले हाेते. एका व्हिडीओत फूड डिलिव्हरी बाॅय रस्त्यात थांबून ग्राहकांच्या पार्सलमधील अन्न खात असल्याचे समाेर आले हाेते. त्याचबराेबर त्यांच्या आराेग्याचा मुद्दा देखील चर्चीला जात हाेता. फुड डिलिव्हरी करणाऱ्यांचे हेल्थ चेकअप करणे कायद्याने बंधनकारक असून याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) करण्यात येणार आहे. या फूड डिलिव्हरी करणाऱ्यांचे हेल्थ चेकअप केले नसल्यास एफडीएकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. येत्या एक एप्रिलपासून ही कारवाई करण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये फूड डिल्हिवरी करणाऱ्यांच्या अनेक तक्रारी समाेर आल्या हाेत्या. फूड डिलिव्हरी करणारे हे केवळ हाॅटेलमधील अन्न हे ग्राहकांपर्यंत पाेहचविण्याचे काम करतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे हेल्थ चेकअप करणे गरजेचे नसल्याचा समज निर्माण झाला हाेता. परंतु या कर्मचाऱ्यांचे सुद्धा हेल्थ चेकअप करणे एफडीएच्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. याचा हेतू ग्राहकांना अन्न सुरक्षित रित्या मिळावं हा आहे. त्यांना कुठलाही त्वचा राेग किंवा इतर संसर्गजन्य आजार असता कामा नये. चेन्नई येथील एका ग्राहकाला त्याच्या अन्नामध्ये रक्त असलेलं बॅण्डेज आढळून आले हाेते. त्याची माेठ्याप्रमाणावर साेशल मीडियावर चर्चा झाली हाेती. त्यामुळे आता फूड डिलिव्हरी करणाऱ्यांचे वेळाेवेळी हेल्थ चेकअप करणे आणि त्याची माहिती ठेवणे कंपन्यांना बंधनकारक असणार आहे. येत्या एक एप्रिलपासून धडक माेहीम हाती घेऊन हेल्थ चेकअप नसेल तर एफडीएकडून कारवाई करण्यात येणार आहे.
याबाबत बाेलताना एफडीएच्या पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख म्हणाले, कायद्यानुसार सर्वच हाॅटेलमध्ये काम करणारे वेटर आचारी आणि फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना हेल्थ चेकअप करणे बंधनकारक आहे. अॅप्सच्या माध्यमातून फूड डिलिव्हरी करणाऱ्यांना याची आवश्यकता नाही असा समज निर्माण झाला हाेता. ताे चुकीचा आहे. फूड हॅण्डलिंग करणाऱ्या प्रत्येकाला हेल्थचेकअप करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याचबराेबर अशा कर्मचाऱ्यांना कुठलाही त्वचा राेग असू नये तसेच इतर संसर्गजन्य आजार असून नयेत. येत्या एक एप्रिल पासून एफडीएकडून कर्मचाऱ्यांचे हेल्थ चेकअप करण्यात आले आहे की नाही याची तपासणी करण्यता येणार आहे. यात अन्न पदार्थ हाताळणाऱ्या सर्वांचाच समावेश असणार आहे. हाॅटेल्सबराेबरच किराणा मालाच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश आहे.