भय इथले संपत नाही..! उजनी धरण क्षेत्रात मगरीचे पुन्हा वास्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 06:11 PM2019-12-03T18:11:54+5:302019-12-03T18:34:29+5:30
उजनी धरणातील पाण्यात मगरी आढळत असल्याच्या चर्चा दोन तीन वर्षापासून होत आहेत..
इंदापूर : उजनी धरणात मगर आहे अशा चर्चा मागील दोन वर्षापासून होत होत्या. आणि अशातच चार दिवसापूर्वी भीमा नगर परिसरात महाकाय मगर सापडली आणि मच्छिमार आणि शेतकरी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.मात्र ती महाकाय मगर वनविभागाने पुन्हा उजनीकिनारी असणाऱ्या वनविभागाच्या अधिवासात सोडल्याच्या चर्चेमुळे मासेमार ,शेतकरी आणि पर्यटक यांच्यात भीती पसरली असल्याचे दिसून येत आहे.
उजनी धरणातील पाण्यात मगरी आढळत असल्याच्या चर्चा गेल्या दोन तीन वर्षापासून होत आहेत.करमाळा तालुक्यातील कंधर येथे मासेमाराच्या जाळीत मगर अडकली होती.तर उजनी येथील भीमानगर येथील मत्स्य केंद्राच्या तळ्यामध्ये मगरी असल्याच्या माहिती मिळत होती.तर इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव ,तक्रारवाडी आणि डिकसळ परिसरातही मासेमाराना मगरीने दर्शन दिलेले असल्याची माहिती मिळत आहे.असे असताना दोन दिवसापूर्वी १२ फुट लांब आणि जवळपास १५० ते २०० किलो वजनाच्या महाकाय मगरीला भोई समाजातील महादेव नगरे ,मामू भोई ,नितीन सल्ले ,अशोक पतुले ,रवींद्र नगरे या मासेमार तरुणांनी जीवाची बाजी लावून पकडण्यात यश मिळविले होते.तसेच या महाकाय मगरीला पकडून वनविभागाच्या हवाली करण्यात आले होते.मात्र वनविभागाने हि मगर धुमाळवाडी येथील उजनी शेजारील वनक्षेत्रात सोडल्याची माहिती मिळाल्याने शेतकरी तसेच मासेमार धास्तावून गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.तर या ठिकाणी देशभरातून अनेक पर्यटक परदेशी पक्षांना पाहण्यासाठी येत असतात त्यांच्या जीवितालाही धोका असल्याचे बोलले जात आहे.मगर या भागात सोडल्याच्या माहितीमुळे शेतकरी शेताला पाणी देण्यास जाण्यासाठी घाबरू लागल्याचे सांगितले जात आहे.
उजनी धरणाच्या किनारी असणाऱ्या वनविभागाच्या क्षेत्रालगत अनेकांची बागायत शेती असून जर वनविभागाने या ठिकाणी मगर सोडली असेल तर ते अत्यंत धोक्याचे असल्याचे सांगितले.तर वन्यजीव महत्वाचे असले तरी त्याचा मानवी जीवनावर धोका असेल तर याचा शासनाने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
वनविभागाने उजनी किनारी असणाऱ्या वन क्षेत्रात मगर सोडली असल्याची माहिती काही मच्छीमार बांधवांनी दिली आहे. मात्र यातून मासेमारांच्या जीविताला धोका पोहचू शकतो आणि याची जबाबदारी वनविभाग घेणार आहे का असा सवाल महाराष्ट्र राज्य संघर्ष कृती समितीचे नंदकुमार नगरे यांनी केला.तसेच जर अशाप्रकारे मगर सोडल्याचे निष्पण झाल्यास मच्छीमार आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
याबाबत इंदापूर वनक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना माहिती विचारली असता त्यांनी ही मगर इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रात मुक्त केली असल्याचे सांगितले.मात्र, ती मगर नक्की कोणत्या ठिकाणी सोडली याबाबत माहिती देण्याचे टाळले. तसेच सापडलेल्या मगरीवर उपचार करण्यासाठी राजीव गांधी अनाथालयातील पथक आले असल्याचे सांगितले.मात्र, कात्रजला ठेवण्यासाठी उपाय योजना नसल्यामुळे तसेच वन्यजीव कायदा नुसार मगर वनविभागाच्या अधिवासात सोडली असल्याचे सांगितले.