राजगुरुनगर जवळील चांडोली येथे स्त्री जातीचे मृत अर्भक आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 03:13 PM2019-06-24T15:13:21+5:302019-06-24T15:16:13+5:30
खेड तालुक्यातील चांडोली येथील नर्मदा सोसायटीमध्ये स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
राजुगुरुनगर (दावडी) : खेड तालुक्यातील चांडोली येथील नर्मदा सोसायटीमध्ये शौचालय टाकीच्या चेंबरवर स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी ( दि. २४ जून) सकाळी १० घटना उघडकीस आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर शहरालगत चांडोली हे गाव आहे. तिथे नर्मदा सोसायटी आहे. सोमवारी सकाळी १० वाजता राखी युवराज चौधरी (रा. चांडोली ता. खेड ) यांना संडासच्या टाकीच्या चेंबरवर अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत लहान बालकाचे अर्भक दिसून आले. त्यांनी आजूबाजूचा नागरिकव खेड पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली.खेड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमरदीप वंजारी व गणेश गवारे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन स्त्री जातीच्या अर्भकाला चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र ,डॉक्टरांनी अर्भक मृत असल्याचे घोषित केले. हे नवजात बालक आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जन्मलेले असुन त्यांच्या पोटावर छातीवर पायावर ओरखडल्याच्या खरचटल्याच्या खुणा दिसत आहे. नवजात अर्भकाचे शवविच्छेदन झाल्यानंतर हे मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे चांडोली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी गीता कुलकर्णी यांनी सांगितले. त्याचा व्हिसेरा ससून रुग्णालय पुणे येथे पाठवण्यात येणार आहे. स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत सापडल्यामुळे त्यामुळे स्थानिक नागरीकांत संताप व्यक्त केला आहे. खेड पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेतले असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.