शिक्षकानेच केला विद्यार्थीनींचा लैंगिक छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 07:16 PM2019-01-19T19:16:54+5:302019-01-19T19:25:42+5:30
वर्गशिक्षक विद्यार्थीनींसाेबत अश्लिल चाळे करत असल्याचा प्रकार समाेर आला आहे.
पुणे : हडपसर, येथील एका शाळेतील वर्गशिक्षकानेच अश्लील व्हिडीओ दाखवून डान्स शिकविण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनींच्या खासगी भागांना हात लावून घरी येऊन तसे करण्याची धमकी दिली. हा प्रकार विद्यार्थिनीने घरी येऊन आईला सांगिल्यानंतर समोर आला. याप्रकरणी तेरा वर्षीय पिडीतेच्या आईने फिर्याद दाखल केली असून वर्गशिक्षकावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, रामेश्वर राठोड (रा. खराडी चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. फिर्यादी या धुणीभांडीचे काम करतात. तर त्यांचे पती ड्रायवर आहेत. त्यांना तीन आपत्ये आहेत. त्यांची मोठी मुलगी तेरा वर्षांची आहे. ती हडपसर येथील माळवाडी परिसरात असलेल्या एका शाळेत सहावीच्या वर्गात शिकते. दरम्यान गुरुवारी मुलगी घरी आल्यनंतर तिने वर्गशिक्षक राठाेड हे डान्स शिकविण्याच्या बहाण्याने मला व मैत्रिणींना खाजगी जागेत हात लावतात. तसेच वर्गात अश्लिल व्हिडीओ दाखवतात. ही बाब काेणाला सांगितल्यास तसा प्रकार घरी येऊन करेन अशी धमकी दिल्याचे मुलीने आईला सांगितले.
विद्यार्थिनी एखादा प्रश्न विचारण्यास गेल्यावर विद्यार्थीनीच्या खासगी भागांवरून राठाेड हात फिरवत. गेल्या एक महिन्यांपासून राठाेड वर्गातील मुलींसोबत हा प्रकार करत हाेता. फिर्यादी महिलेने याची खात्री करण्यासाठी शाळेत धाव घेतली. पिडीत मुलीच्या वर्गमैत्रिणीलाही याबाबत विचारणा केल्यावर दोन आठवड्यापुर्वी राठोडने असाच प्रकार तिच्यासोबत केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर महिलेने पतीला बोलावून हा प्रकार सांगितला. तसेच शाळेतील टिच फॉर इंडीया फेलो मधील दोन महिलांना याबाबत सांगितल्यावर त्यांनी एका एनजीओच्या दोन महिलांना कळविले. त्यांनी मुलींकडे येऊन चौकशी केल्यावर त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. रामेश्वर राठोड हा वर्गातील सर्वच मुलींसोबत हा प्रकार करत असल्याची माहिती पुढे आली आहे .पुढील तपास उपनिरीक्षक एस एस गावडे करीत आहेत.