दोन तासांत बनवले पंधरा हजार सीडबॉल!
By admin | Published: June 15, 2017 04:45 AM2017-06-15T04:45:11+5:302017-06-15T04:45:11+5:30
कुतवळवाडी येथे दोन तासांत १५ हजार सीडबॉल तयार करण्यात आले. बारामती येथील शरयू फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुपे : कुतवळवाडी येथे दोन तासांत १५ हजार सीडबॉल तयार करण्यात आले. बारामती येथील शरयू फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
येत्या पावसाळ्यात हजारो वृक्षलागवड करण्याचा मानस शरयूचा असल्याने, वृक्षलागवड व त्यांच्या संवर्धनासाठी शरयूच्या माध्यमातून सीडबॉल हा एक नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कुतवळवाडी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी माती, शेण, पाणी मिश्रण करून छोटे चिखलाचे गोळे तयार करून त्यात करंज, चिंच, जांभूळ आणि काशीद आदी पर्यावरणपूरक जंगली झाडांच्या बिया टाकण्यात आल्या.
या वेळी भैरवनाथ मंदिरात देवदर्शनासाठी आलेले नवदाम्पत्यही या उपक्रमात सहभागी झाले होते. शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या संस्थेचा हा सातवा उपक्रम असून, यापूर्वी तालुक्यातील कळस, गुणवडी, कण्हेरी, तरडोली तर फलटणमधील कापशी व मुंजवडी तो येथे राबविण्यात आला असल्याची माहिती पवार यांनी दिली. या वेळी युवक फाउंडेशनच्या अश्विनी खरसे, वंदना मोहिते, संगीता भापकर आदींसह युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. संयोजन भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले.