साहित्य संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 04:06 AM2018-10-26T04:06:26+5:302018-10-26T04:06:35+5:30
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी यंदापासून निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाणार आहे.
पुणे : अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी यंदापासून निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाणार आहे. त्यासाठी साहित्य संस्थांनी सुचवलेल्या नावांमध्ये ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर आणि डॉ. अरुणा ढेरे यांचा समावेश आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या इतिहासात पाचव्यांदा अध्यक्षपदी महिला विराजमान होणार का, याबाबतची उत्सुकता आहे.
यवतमाळ येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी साहित्य महामंडळाकडे सर्व घटक संस्था, संलग्न संस्था आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष यांच्याकडून नावे प्राप्त झाली
असून, २८ आॅक्टोबर रोजी होणाºया बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे
डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. अरुणा ढेरे आणि ना. धों.महानोर ही नावे पाठवली आहेत. मुंबई मराठी साहित्य संघाकडून डॉ. बाळ फोंडके आणि रामदास भटकळ, डॉ. प्रेमानंद गज्वी, विदर्भ साहित्य संघाकडून डॉ. प्रभा गणोरकर आणि किशोर सानप, छत्तीसगडकडून प्रेमानंद गज्वी, गोमंतककडून सोमनाथ कोमरपंत,
मध्य प्रदेशकडून भारत सासणे,
बडोदे आणि तेलंगणातून डॉ.
अरुणा ढेरे आणि कर्नाटकातून
डॉ. रवींद्र शोभणे यांची नावे महामंडळाकडे पाठवल्याची माहिती मिळाली आहे.
साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात कुसुमावती देशपांडे,
दुर्गा भागवत, शांता शेळके,
विजया राजाध्यक्ष या चार महिलांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे.
>‘त्या’ नावांचा विचार होणार नाही
मराठवाडा साहित्य परिषदेकडून नरेंद्र चपळगावकर, ना. धों. महानोर व प्रेमानंद गज्वी यांचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र, चपळगावकर आणि महानोर यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने परिषदेला नावे मागे घ्यावी लागली. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेच्या नावांचा बैठकीत विचार केला जाणार नाही.