कंत्राटदारावर गुन्हा दाखल
By admin | Published: March 2, 2015 02:42 AM2015-03-02T02:42:10+5:302015-03-02T09:50:48+5:30
गेल्या काही दिवसांपासून शहरात उभारण्यात येणाऱ्या ‘फोर जी’ टॉवरविरोधात रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरात उभारण्यात येणाऱ्या ‘फोर जी’ टॉवरविरोधात रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राजकीय नेत्यांनीही या टॉवरना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे रहिवाशांचा विरोध असताना धमकावत टॉवर उभारणाऱ्या रिलायन्स कंपनीच्या कंत्राटदारावर आज, रविवारी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोबाइलच्या रेडिएशन्समुळे अनेक घातक आजार होत असल्याने अनेक रहिवाशांनी इमारतींवरील असलेले मोबाइल टॉवर काढून टाकले आहेत. त्यामुळे सध्या इमारतींवर मोबाइल टॉवर्सना जागाच मिळत नसल्याने पालिकेच्या मैदानांवर ‘फोर जी’ टॉवर उभारण्याचा घाट सध्या शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खेळाच्या मैदानांवर अशा प्रकारे टॉवर उभारल्यास त्यामधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे लहान मुलांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. त्यामुळे चेंबूरनंतर भांडुप आणि मुलुंडमधील रहिवाशांनी या ‘फोर जी’ टॉवरना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कंत्राटदार एन. के. सिंह आणि त्याच्या साथीदारांनी रहिवाशांना धमकावले. त्यानुसार आज मुलुंड पोलिसांनी कंत्राटदारासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)