बेजबाबदारपणे गुन्हे दाखल केल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:09 AM2020-12-02T04:09:26+5:302020-12-02T04:09:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड : दोन गुन्हे बेजबाबदारपणे दाखल करून एका महिलेला सूर्यास्तानंतर अटक केल्याचा ठपका ठेवत चिंचवडचे तत्कालीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी-चिंचवड : दोन गुन्हे बेजबाबदारपणे दाखल करून एका महिलेला सूर्यास्तानंतर अटक केल्याचा ठपका ठेवत चिंचवडचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांना १७ नोव्हेंबरपासून पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डाॅ. सागर कवडे या प्रकरणी चाैकशी करीत आहेत.
रवींद्र जाधव हे चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. १३ नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तालयांतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये निरीक्षक जाधव यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तत्पूर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना जाधव यांनी दोन गुन्हे बेजबाबदारपणे दाखल केल्याचे म्हटले आहे. १९ ऑक्टोबर रोजी एका विनयभंगाच्या गुन्ह्यात सकृतदर्शनी पुरावा नसताना देखील गुन्हा दाखल करून त्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. तसेच सरकारी कामात अडथळा आणि मारहाणप्रकरणी त्याच दिवशी आणखी एक गुन्हा दाखल करून नियमबाह्यपणे सूर्यास्तानंतर एका महिलेला अटक केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
-----
सदरचा प्रकार घडण्याच्या काही दिवसांपूर्वीपासूनच चिंचवड पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे सदर प्रसंग कॅमेराबद्ध झाला नाही. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले, असा आरोप चुकीचा आहे. याप्रकरणी चाैकशी सुरू असून, त्याचा अहवाल पोलीस आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येईल.
- डाॅ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग