वाहनचालक गेले भारावून; तेंडुलकर कुटुंबाकडून यंदाही दिवाळीत भेटकार्ड वाटण्याचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:13 PM2017-10-18T13:13:17+5:302017-10-18T13:28:14+5:30
व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने वीस वर्ष नळ स्टॉप चौकात दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनानंतरही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
पुणे : वाहतूक नियम पालनाची सवय लागावी, वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे, दिवाळी भेटकार्ड म्हणून वाहनचालकांना वाटत असत. त्यांची ही परंपरा कुटुंबाने जपली आहे.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे सातत्याने वीस वर्ष नळ स्टॉप चौकात दिवाळीत वाहतूक समस्येवर स्वत: रेखाटलेली व्यंगचित्रे दिवाळी भेटकार्ड म्हणून वाटत असत. नागरिकांना वाहतूक नियम पालनाची सवय व्हावी आणि पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनानंतरही हा उपक्रम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कन्या वंदना तेंडुलकर, नात श्रावणी ढवळे, शुभंकर ढवळे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विजय कदम, सचिन दांगट, वैष्णवी दांगट, मोहन आपटे, पूजा गिरी, प्रदीप गिरी, बाबा चौकसे यांच्यासह वाहन अपघातात आपल्या मुलांना गमावणारे गुरुसिद्धय्या स्वामी, शशी स्वामी आणि त्यांची कन्या स्नेहल स्वामी, तसेच वाडिया कॉलेज जवळील अपघातात आपल्या कन्येला गमावलेल्या सुनंदा जप्तीवाले सहभागी झाले होते.
बाबांना दिवाळीच्या फराळात नवीन कपडे किंवा इतर कशात ही रस नव्हता. त्यांना समाजातील उणीवा दूर करण्याचा ध्यास होता आणि विशेष करून अपघातांमध्ये कोणाच्याही कुटुंबातील सदस्य दगावू नयेत, यावर त्यांचा भर होता. वाहतूक नियम पाळा हा सोपा संदेश ते आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून देत असत आणि म्हणून मी आणि माझ्या मुलीने त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केला, असे मंगेश तेंडुलकर यांच्या पत्नी स्नेहलता तेंडुलकर म्हणाल्या.
केवळ दंडात्मक कारवाईतून नव्हे तर लोकप्रबोधनातून वाहतूक समस्या सुटू शकेल असा त्यांना विश्वास होता, मी स्वत: १३ वर्ष मंगेशजींसोबत या उपक्रमात सहभागी होत असे. त्यांच्या निधनाने दिवाळीत पोकळी जाणवत होती, पण स्नेहलता तेंडुलकर यांचा फोन आला आणि आम्ही ही परंपरा सुरु ठेवणार आहोत, असे त्यांनी मला सांगितले आणि माझी दिवाळी सत्कारणी लागली, असे मत सातत्याने १३ वर्ष या उपक्रमात सहभागी होणारे क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. कोणत्याही मोठ्या माणसाच्या निधनापश्चात त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर काम करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होय, असे मत नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.
आपल्या नगरसेविका भर चौकात ऐन दिवाळीत शुभेच्छापत्र वाटत आहेत आणि वाहतुकीचे नियम पाळा असे आवाहन करीत आहेत याचे वाहनचालकांना अप्रूप वाटत होते व अनेक लोक थांबून शुभेच्छापत्र स्वीकारत होते. तर वर्षानुवर्षे या चौकात अशी भेट घेणारे अनेक नागरिक त्यांच्या आठवणी जागवत होते.