नीरा येथे भरधाव कंटेनर घुसला दुकानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:44 PM2018-09-29T23:44:06+5:302018-09-29T23:44:21+5:30
पाडेगाव टोलनाक्यावरील घटना : सात व्यावसायिकांचे नुकसान
नीरा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पाडेगाव टोलनाक्यावर शनिवारी पहाटे दीड वाजता भरधाव कंटेनर बंद टोलनाक्याशेजारील व्यावसायिकांच्या दुकानात घुसला. त्यामुळे सात दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व व्यावसायिकांच्या दुकानाचे पुढील भागाचे शटर जमीनदोस्त झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मागील महिन्यात टोलनाक्यात एक कंटेनर शिरला होता. तेव्हापासून हा टोलनाका नादुरुस्तच आहे. टोलनाक्याच्या छताचा काही भाग खाली आलेला तसाच आहे. रात्री अंधारात तो भाग अचानक दिसल्याने चालक घाबरला व त्याने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी कंटेनर डाव्या बाजूला घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. या भीषण अपघातानंतर बंद टोलनाक्याविषयी लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुकानांच्या सर्व भिंतींना तडे गेले आहेत. रात्री कोणी या ठिकाणी झोपण्यास नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या परिसरात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, आश्रम शाळा-कॉलेज, मंगल कार्यालय इत्यादी वर्दळीची ठिकाणे आहेत. रात्री उशिरा अपघात झाल्याने मोठा अनर्थ टळला.
पाडेगाव येथील टोलनाका हा १ जुलै २०१४ रोजी महाराष्ट्रातील ४४ टोलनाके बंद करण्यात आले त्यापैकी आजही हा टोलनाका का उभा आहे. यावर कोणीच मेहरनजर आहे, हा प्रश्न आहे. टोलनाका बंद असला तरीही हा भाग कायम गजबजलेला असतो. नीरा नदीवरील उंच पूल व लोणंद येथील रेल्वे क्रॉसिंग येथे उड्डाणपुलासह रस्ता रुंदीकरण सन २००३-०५ मध्ये करण्यात आले. बांधा वापरा हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर हे काम करण्यात आले. २०१४ मध्ये मुदत संपल्यानंतर टोलवसुली थांबवण्यात आली. तेव्हापासून आजतागायत टोलनाका तसाच उभा आहे. टोलनाक्यावर मोठे शेड असल्याने रात्री चंद्राचाही प्रकाश रस्त्यावर पडत नाही. परिणामी सगळ्या परिसरात अंधार असतो.